औरंगाबाद : २०२० पर्यंत देशातून गोवरचे निर्मूलन करण्यासाठी सुरू केलेल्या गोवर, रुबेला लसीकरण मोहिमेबाबत असलेले गैरसमज आणि अफवा थांबविण्यासाठी शिक्षण आणि आरोग्य विभागाने पथके तैनात केली आहेत. ज्या गावांमध्ये या लसीकरणाविषयी शंका उपस्थित केली जात आहे, त्याठिकाणी पथके जाऊन जनजागृती करीत आहेत. यास उत्तम प्रतिसाद मिळत असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ.नीता पाडळकर आणि जि. प. शिक्षण विभागाच्या नोडल अधिकरी अश्विनी लाठकर यांनी दिली.
शहर आणि जिल्ह्यातील नोंदणीकृत शाळांमध्ये ९ महिने ते १५ वर्षांपर्यंतच्या बालक, विद्यार्थ्यांना गोवर, रुबेलाचे लसीकरण करण्यात येत आहे. यात जि. प. अंतर्गत असलेल्या ग्रामीण भागातील ३०३० आणि नगरपालिका कार्यक्षेत्रातील २७३ शाळांमध्ये एकूण ५ लाख ७२ हजार ४४० विद्यार्थ्यांना लस दिली जाणार आहे. या मोहिमेला २७ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. पहिल्या तीन दिवसांत जिल्ह्यात ३० हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना लस देण्यात आली. यासाठी गटशिक्षणाधिकारी यांच्या नियंत्रणात पथके तैनात केली आहेत. ज्या गावांमध्ये काही पालकांमध्ये गैरसमज आहेत, त्यांचे गैरसमज तात्काळ दूर केले जात असल्याची माहिती उपशिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी दिली.
याशिवाय जिल्हा आरोग्य विभागाचे अधिकारीही मोहिमेत काम करीत असल्यामुळे मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही मोहीम सहा आठवड्यांत पूर्ण करण्याचे आव्हानही शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वीकारले असल्याचे लाठकर यांनी स्पष्ट केले. औरंगाबाद शहरातील ११४० शाळांमध्ये ही मोहीम राबविण्यात येत आहे. यात ३ लाख १२ हजार ४३९ विद्यार्थी आणि पूर्व प्राथमिकच्या बालकांसह ४ लाख ८१ हजार ६१६ जणांना ही लस देण्यात येत आहे. पहिल्या तीन दिवसांत २८ हजार विद्यार्थी, बालकांना ही लस देण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली. ग्रामीण आणि शहरी, अशा एकूण १० लाख ५४ हजार ५६ विद्यार्थ्यांना ही लस देण्यात येणार आहे.
पालकांच्या शंका दूर होताहेतगोवर, रुबेला लसीकरणाबाबत सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या विविध संदेशांमुळे पालकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. हा संभ्रम दूर करण्यास शासकीय यंत्रणांना यश मिळत आहे. नागरिकांनी या अफवांवर विश्वास ठेवू नये, २०२० मध्ये देश गोवरमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी २१ राज्यांमध्ये ही मोहीम राबविली असल्याचे डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.