पाटोदा : तालुक्यातील दासखेड येथे ऊसतोड मजुरांच्या पाल्यांसाठी उघडण्यात आलेल्या हंगामी वसतिगृहामधील १० विद्यार्थ्यांना शुक्रवारी सकाळच्या जेवणानंतर विषबाधा झाली. या विद्यार्थ्यांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून दुपारनंतर सुटी देण्यात आली.जिल्ह्यात सहा लाखांवर अधिक ऊसतोड मजूर स्थलांतरित होतात. त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाची आबाळ होऊ नये यासाठी हंगामी वसतिगृहे उभारण्यात आलेली आहेत. या अंतर्गत दासखेड येथे देखील वसतिगृह सुरू असून, त्यात ९० विद्यार्थ्यांची सोय करण्यात आलेली आहे. पहिली ते सावतीच्या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. नित्याप्रमाणे शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता विद्यार्थ्यांना बटाट्याची भाजी व बाजरीची भाकरी जेवणात दिली होती. एकूण ७० हून अधिक विद्यार्थी जेवणासाठी उपस्थित होते. जेवणानंतर १० विद्यार्थ्यांना उलट्या, मळमळ असा त्रास जाणवू लागला. त्यानंतर वसतिगृह चालक व ग्रामस्थांनी या विद्यार्थ्यांना तातडीने खासगी वाहनातून पाटोदा येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. साजिया बेगम यांनी या विद्यार्थ्यांवर उपचार केले. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता त्या सर्वांना सुटी देण्यात आली. विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून, काळजीचे कारण नाही, असे डॉक्टरांनी सांगितले.प्रभारी मुख्याध्यापक सुटीवरहंगामी वसतिगृहांवर मुख्याध्यापकांचे नियंत्रण असते. शालेय समितीमार्फत वसतिगृहे चालविली जातात. विद्यार्थी नातेवाईकांकडे वास्तव्यास ठेवून वसतिगृहात केवळ जेवण व इतर साहित्य उपलब्ध करून दिले जाते. मात्र, प्रभारी मुख्याध्यापक प्रशांत डोके हे गेल्या काही दिवसांपासून विनापरवाना सुटीवर आहेत. गटशिक्षणाधिकारी डी. एच. बोंदार्डे म्हणाले, चौकशी करून कारवाई केली जाईल. (वार्ताहर)
१० विद्यार्थ्यांना विषबाधा
By admin | Published: February 04, 2017 12:36 AM