हिंगोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून गुरूवारी जिल्ह्यातील २६ केंद्रावरून घेतलेल्या बारावी परीक्षेस १०,५९० विद्यार्थी हजर राहिले. तर ३९१ जणांनी परीक्षेस दांडी मारली. ११ ते २ या वेळेत इंग्रजीचा पेपर विद्यार्थ्यांनी सोडविला.विविध केंद्रावरून झालेल्या बारावीच्या परीक्षेदरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. परीक्षा सुरळीत पार पडावी, यासाठी शिक्षण विभागाकडून अगोदरच नियोजन केले होते. नेहमीप्रमाणे यावर्षीही कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी विशेष महिला पथक, निरंतर शिक्षण विभाग, प्राथमिक-माध्यमिक व महसूल विभागाच्या पथकांनी परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. तर व्हिडिओ शूटिंगच्या दोन पथकांद्वारे आठ ठिकाणी भेटी देऊन केंद्र परिसराची पाहणी केली. कॉपीमुक्त अभियानासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न सुरू असले आहेत. यावेळी विद्यार्थ्यांची गैरसोय होणार याची काळजी घेत परीक्षा केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्याची माहिती उपशिक्षणाधिकारी व्ही. जी. पाटील यांनी दिली. (प्रतिनिधी)
बारावीचे १० हजार ५९० परीक्षार्थी हजर
By admin | Published: February 18, 2016 11:29 PM