औरंगाबाद : औरंगाबाद परिसरात उद्योगांसाठी १० हजार एकर जमीन उपलब्ध आहे. गेल्या चार वर्षांत ‘एमआयडीसी’ने १७५ भूखंडांचे वाटप केले. त्यातून २५४ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून, आॅरिक सिटी आणि उपलब्ध जागांमुळे आगामी कालावधीत उद्योगांसाठी औरंगाबाद हेच केंद्र ठरणार आहे.
‘एमआयडीसी’ने २०१५ ते २०१८ या कालावधीत १७५ भूखंडांचे वाटप केले आहे. यामध्ये सर्वाधिक भूखंड हे २०१६ मध्ये वाटप झाले. तर भूखंड वाटपातून सर्वाधिक गुंतवणूक ही २०१७ मध्ये १५६ कोटी रुपयांची झाली आहे. २०१८ या वर्षात आतापर्यंत ४३ भूखंड वाटप करण्यात आले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत औरंगाबाद, जालना आणि बीड हे तीन जिल्हे आहेत. तिन्ही जिल्ह्यांत औरंगाबादेत वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा, रेल्वेस्टेशन या औद्योगिक क्षेत्रांबरोबर अतिरिक्त शेंद्रा, लाडगाव-करमाड औद्योगिक क्षेत्र डीएमआयसी टप्पा-१, बिडकीन औद्योगिक क्षेत्र डीएमआयसी टप्पा-२ यांचा समावेश आहे. चार वर्षांत ‘एमआयडीसी’तर्फे आॅनलाईन आणि ई-बिडिंगद्वारे हे भूखंड वाटप झाले आहेत.
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी) महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. ‘डीएमआयसी’अंतर्गत स्थापन केलेली आॅरिक अर्थात औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटीची उभारणी गतीने सुरू आहे. ‘एमआयडीसी’क डे आजघडीला उद्योगांसाठी औरंगाबाद परिसरातील लाडगाव, करमाड, पैठण, बिडकीन याठिकाणी सुमारे १० हजार एकर जमीन उपलब्ध आहे. कन्नड, सटाणा, जयपूर, गेवराई, अतिरिक्त जालना टप्पा-४ येथील औद्योगिक क्षेत्रांसाठी भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यामुळे आगामी कालावधीत उद्योगांसाठी आणखी जागा उपलब्ध होणार आहे.
मुंबई, पुण्यासह अन्य औद्योगिक क्षेत्रांमध्ये मागणी अधिक आणि जागा कमी, अशी अवस्था आहे. आॅरिक सिटी आणि उपलब्ध जागेमुळे औरंगाबादकडे उद्योगांचा ओढा वाढत आहे. देश-विदेशातील कंपन्या गुंतवणुकीसाठी रुची दर्शवीत आहेत. औरंगाबादेत कार्यरत उद्योगही नवीन जागा घेऊन उद्योगांचा विस्तार करण्यास प्राधान्य देत आहेत.
३,७९३ जणांना रोजगारचार वर्षांत झालेल्या भूखंड वाटपातून सुमारे ३ हजार ७९३ जणांच्या रोजगार निर्मितीला चालना मिळाली. यामध्ये २०१५ मध्ये भूखंड घेतलेल्या अनेकांचे उद्योग सुरू झाले. त्यातून अनेकांना रोजगार उपलब्धही झाले. २०१७, २०१८ या वर्षात भूखंड घेतलेल्यांची उद्योग उभारणीची प्रक्रिया सुरू आहे. त्यातून आगामी कालावधीत रोजगार वाढेल.
औरंगाबादकडे वाढता कल मुंबई, पुणे याठिकाणी जागा कमी असल्याने औरंगाबादकडे उद्योगांचा कल वाढत आहे. शहर परिसरात १० हजार एकर जागा उपलब्ध आहे. त्यामुळे उद्योगांसाठी औरंगाबाद हेच केंद्रबिंदू ठरत आहे.-सोहम वायाळ, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी