लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : औरंगाबाद परिसरात उद्योगांसाठी १० हजार एकर जमीन उपलब्ध आहे. गेल्या चार वर्षांत ‘एमआयडीसी’ने १७५ भूखंडांचे वाटप केले. त्यातून २५४ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून, आॅरिक सिटी आणि उपलब्ध जागांमुळे आगामी कालावधीत उद्योगांसाठी औरंगाबाद हेच केंद्र ठरणार आहे.‘एमआयडीसी’ने २०१५ ते २०१८ या कालावधीत १७५ भूखंडांचे वाटप केले आहे. यामध्ये सर्वाधिक भूखंड हे २०१६ मध्ये वाटप झाले. तर भूखंड वाटपातून सर्वाधिक गुंतवणूक ही २०१७ मध्ये १५६ कोटी रुपयांची झाली आहे. २०१८ या वर्षात आतापर्यंत ४३ भूखंड वाटप करण्यात आले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत औरंगाबाद, जालना आणि बीड हे तीन जिल्हे आहेत. तिन्ही जिल्ह्यांत औरंगाबादेत वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा, रेल्वेस्टेशन या औद्योगिक क्षेत्रांबरोबर अतिरिक्त शेंद्रा, लाडगाव-करमाड औद्योगिक क्षेत्र डीएमआयसी टप्पा-१, बिडकीन औद्योगिक क्षेत्र डीएमआयसी टप्पा-२ यांचा समावेश आहे. चार वर्षांत ‘एमआयडीसी’तर्फे आॅनलाईन आणि ई-बिडिंगद्वारे हे भूखंड वाटप झाले आहेत.दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी) महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. ‘डीएमआयसी’अंतर्गत स्थापन केलेली आॅरिक अर्थात औरंगाबाद इंडस्ट्रीयल सिटीची उभारणी गतीने सुरू आहे.
उद्योगांसाठी १० हजार एकर जमीन उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 1:37 AM