औरंगाबाद : विद्यापीठाशी संलग्न सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्राध्यापकांची रीतसर नियुक्ती नसलेल्या महाविद्यालयांत प्रवेश घेऊ नये, असे आवाहन करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातही १० विभागांत एकच शिक्षक असल्याने या विभागातील शिक्षणाच्या दर्जाविषयीही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रम चालविणाऱ्या महाविद्यालयांनी प्राध्यापकांची पदे भरण्याची कार्यवाही न केल्यास विद्यापीठ प्राधिकरणाच्या निर्णयानुसार महाविद्यालयाच्या विरोधात कठोर दंडात्मक कार्यवाही करण्याचा इशाराही विद्यापीठातर्फे देण्यात आला आहे. पदव्युत्तर महाविद्यालयांत दर्जेदार शिक्षण मिळावे, अशी विद्यापीठाची अपेक्षा आहे. बीसीयूडीतर्फे १० जुलै रोजी सर्व संलग्नित महाविद्यालयांना याबाबतचे परिपत्रकही पाठविण्यात आले आहे. मात्र, विद्यापीठच जिथे एकशिक्षकी शाळेप्रमाणे विभाग चालवीत आहे, प्राध्यापकांची रीतसर नियुक्ती करीत नाही, व्हिजिटिंग फॅकल्टीवर भर देते अशावेळी विद्यापीठाला महाविद्यालयांवर कारवाई करण्याचा नैतिक अधिकार तरी आहे काय, अशा प्रतिक्रिया विद्यार्थी आणि प्राध्यापकांमधून व्यक्त होत आहेत. विद्यापीठात २००८ साली मोठी शिक्षकभरती झाली. त्यानंतर २०१० साली काही पदे भरली गेली. मात्र, त्यानंतर मोठी भरती झालीच नाही. त्याचा परिणाम अनेक विभागांमध्ये प्राध्यापकांची पदे मंजूर आहेत; पण ती रिक्त आहेत. त्यामुळे ‘व्हिजिटिंग फॅकल्टी’वर अध्यापनाची धुरा येऊन पडली आहे. ‘व्हिजिटिंग फॅकल्टी’ त्यांच्या सोयीनुसार विद्यापीठात येत असल्याची परिस्थिती आहे.विद्यापीठ विभागात अनेक ठिकाणी एक-दोन प्राध्यापक कार्यरत आहेत. महाविद्यालयातील पदव्युत्तर प्राध्यापकांच्या जागा भरण्याचा विद्यापीठाने जरूर आग्रह धरला पाहिजे. त्याच बरोबरीने विद्यापीठातील जागाही तातडीने भराव्यात व महाविद्यालयांसमोर आदर्श ठेवावा.- डॉ. वाल्मीक सरवदे, अध्यक्ष बामुक्टा
१० एकशिक्षकी विभागाचे काय?
By admin | Published: July 15, 2015 12:35 AM