औरंगाबाद : मिटमिटा येथील गट नं. ३०७ आणि ५६ मध्ये महसूल विभागाने १०० एकर जागा महापालिकेला सफारीपार्क उभारण्यासाठी दिली आहे. या जागेवर काही अतिक्रमणे झाली आहेत. १०० एकर नेमकी कुठपर्यंत आहे, हे मनपाला माहीत नाही. त्यामुळे भूमी अभिलेख विभागाच्या मदतीने सोमवारपासून मनपाने संपूर्ण जागेची मोजणी सुरू केली आहे. मोजणीनंतर मनपा त्वरित आपली बाऊण्ड्री निश्चित करणार आहे. मनपाच्या जागेतील लहान-मोठी अतिक्रमणेही काढून टाकण्यात येणार आहेत.
गट नं. ३०७ आणि ५६ मध्ये शासनाची बरीच मोठी गायरान जमीन आहे. ३०७ या एकट्या गटात ८४ हेक्टर जागा आहे. त्यातील काही जागा मनपाला दिली आहे. गट नं. ५६ मधील काही भाग सफारीपार्कमध्ये येतो. महापालिकेने दीड वर्षापूर्वी जागेचा ताबा घेऊन जमीन सपाटीकरण, वृक्षारोपण आदी उपक्रमही सुरू केले. नंतर या जागेवर बरीच अतिक्रमणे असल्याचे मनपाच्या निदर्शनास आले. खाजगी अतिक्रमणधारक ही जागा आमच्या मालकीची आहे, असा दावा करीत आहेत. त्यामुळे महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाला विनंती केली की, सफारीपार्कची १०० एकर जागा नेमकी कुठे आणि कुठपर्यंत आहे ते एकदा निश्चित करून द्यावे.
अप्पर तहसीलदार रमेश मुनलोड यांनी भूमी अभिलेख विभागाला पत्र लिहून जागेची मोजणी करून देण्याचे आदेश दिले. त्यानुसार सोमवार, दि.१८ डिसेंबरपासून भूमी अभिलेख विभाग गट नं. ३०७ आणि ५६ संपूर्ण मोजत आहे. संपूर्ण गट मोजण्याचे कारण असे की, सफारीपार्कला जागा दिल्यानंतर शासनाची उर्वरित जमीन किती शिल्लक राहते याचा अंदाजही महसूल विभागाला येईल. सातबाºयावर जेवढी जमीन आहे त्यानुसार सध्या कामकाज सुरू आहे. मोजणीत सफारीपार्कच्या जागेचे पॉइंट निश्चित करून देण्यात येणार आहेत.
आणखी ४५ हेक्टर जमीन हवीमहापालिकेला ३०७ आणि ५६ याच गटांमध्ये आणखी ४५ हेक्टर जमीन सफारीपार्कसाठी हवी आहे. भविष्यात मनपाला आणखी जागा देण्याचा निर्णय झाल्यास महसूल विभागाला जागे देणे सोपे जाईल. मोजणी करताना मनपाच्या पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, मालमत्ता आणि अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. भूमी अभिलेख विभागातर्फे शेख आरेफ व त्यांचे सहकारी उपस्थित होते.