छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियानांतर्गत १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यातून विद्यापीठात ‘सेंट्रल प्लेसमेंट सेल’ यासह प्रत्येक विभागात दोन स्मार्ट क्लासरूम व एक स्वतंत्र संगणक लॅब उभारण्यात येणार असल्याची घोषणा कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ वर्धापन दिनाच्या मुख्य सोहळ्यात कुलगुरू डॉ. फुलारी म्हणाले, प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण अभियानांतर्गत (पीएम उषा) विद्यापीठाने पाठवलेला १०० कोटींचा प्रस्ताव केंद्राच्या शिक्षण विभागाने मंजूर केला असून, काल रात्रीच झालेल्या ऑनलाइन बैठकीत ‘गो अहेड’, असा निरोप मिळाला. त्यातून आता विद्यापीठ आणि संलग्नीत महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच ‘सेंट्रल प्लेसमेंट सेल’ची स्थापना केली जाईल. यामाध्यमातून आता वर्षातून दोनवेळा नोकरभरती मेळावे आयोजित केले जातील. विद्यार्थ्यांसाठी स्ट्रेस बस्टर सेल सुरू केला जाणार आहे. त्यामध्ये ध्यानसाधना, जीम, डान्सींग हॉल, परफाॅर्मिंग हाॅल, असे सर्व सुविधायुक्त नवीन संकुल उभारले जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन लॅब सुरू करणार असून, त्यात इंटरनेटची सुविधा २४ बाय ७ सुरू राहील. विद्यार्थ्यांना संशोधनासाठी माहिती मिळविणे, आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची व्याख्याने ऐकण्यासाठी उपयोग होईल. प्रत्येक विभागात दोन स्मार्ट क्लासरूम व एक स्वतंत्र संगणक लॅब उभारणार आहोत. याशिवाय मराठवाड्याचा सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी नाट्यगृहाच्या शेजारी स्वतंत्र ‘फोक अँड कल्चर सेंटर ऑफ मराठवाडा’ सुरू केले जाणार आहे. विद्यापीठातील कर्मचाऱ्यांसाठी ‘कर्मचारी कल्याण योजना’ सुरू केली जाईल. यासाठी अधिकारी- कर्मचाऱ्यांकडून दरमहा १०० रुपये घेतले जातील. यातून गरजू कर्मचाऱ्यांना मदत करणार आहोत. १ सप्टेंबरपासून ही योजना सुरू होईल. तसेच, सात कोटी खर्चून उभारण्यात येत असलेला सिंथेटिक ट्रॅक हा मराठवाड्यातील पहिलाच अत्याधुनिक ॲथलेटिक ट्रॅक लवकरच अस्तित्वात येईल, असेही डॉ. फुलारी यांनी नमूद केले.