छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या निधीतून १०० कोटींच्या कामांना अखेर सुरुवात करण्यात आली. ६१ पैकी ५ रस्त्यांची कामे सुरू झाली असून, दिवाळीपूर्वी आणखी बरीच कामे सुरू होणार आहेत. नवीन वर्षात नागरिकांना किमान पन्नास टक्के रस्ते तरी गुळगुळीत मिळावेत, या दृष्टीने महापालिका प्रशासन काम करीत आहे.
शहरातील रस्त्यांसाठी शासनाकडून आणखी १०० कोटींचे अनुदान मिळावे, या दृष्टीने महापालिका प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले. मात्र निधी मिळाला नाही. विधानसभा मतदारसंघनिहाय ही रस्त्यांची यादी, अंदाजपत्रक तयार केले होते. शेवटी महापालिका निधीतूनच रस्ते करण्याचा निर्णय झाला. निविदा प्रक्रियेला बराच विलंब लागला. पावसाळ्यापूर्वी ६१ रस्त्यांसाठी चार वेगवेगळ्या पॅकेजमध्ये कंत्राटदार निश्चित केले. प्रत्येकी २५ कोटींची ही कामे आहेत. पॅकेज-ए मध्ये १२ रस्त्यांची कामे आहेत. पॅकेज-बी मध्ये १७, पॅकेज-सी अंतर्गत १८, तर पॅकेज-डी मध्ये १४ रस्ते आहेत. सर्व कंत्राटदारांना वर्क ऑर्डर देण्यात आल्या. एका कंत्राटदाराला रस्त्यांचे डिझाईन उशिराने दिल्याने ती कामे उशिरा सुरू होतील, असे शहर अभियंता ए. बी. देशमुख यांनी सांगितले. सर्व वॉर्ड अभियंते कार्यकारी अभियंता बी. डी. फड कामांवर लक्ष ठेवून आहेत. सर्व रस्ते सिमेंट पद्धतीने तयार होतील. पुढील दोन महिन्यांत जास्तीत जास्त कामे व्हावीत, या दृष्टीने प्रशासन प्रयत्नशील असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
या ठिकाणी कामे सुरू- गुलमोहर कॉलनी-धर्मवीर संभाजी विद्यालय - सावरकरनगर- जिन्सी चौक ते खासगेट - सीमा दूध डेअरीपर्यंत- सातारा-देवळाईअंतर्गत प्रथमेशनगरी- चौधरी कॉलनी - स्वाध्याय भवन ते शक्ती टाइल्सपर्यंत- जय भवानीनगर अंतर्गत गल्ली क्र. १४- सिडको एन-३, एन-४ पारिजातनगर
स्मार्ट सिटीतून ३१७ कोटींची कामेस्मार्ट सिटी, मनपा निधीतून ३१७ कोटींची कामेही शहरात सुरू आहेत. आतापर्यंत जवळपास ६० पेक्षा अधिक रस्त्यांची कामे पूर्ण झाली. उर्वरित सर्व कामे मार्च २०२४ पूर्वी संपतील, या दृष्टीने स्मार्ट सिटीने नियोजन केले आहे. स्मार्ट सिटीच्या निधीतून काही मुख्य रस्ते गुळगुळीत झाले आहेत.