- विकास राऊत
औरंगाबाद : नांदेड जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१मधील भूसंपादनात १०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची तक्रार विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे करण्यात आली आहे. या तक्रारीत तथ्य आहे की नाही, यासाठी आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. एनएच २११ आणि एनएच ३६१साठी सुमारे २,५०० कोटी रुपयांतून भूसंपादन प्रक्रिया होत आहे. राष्ट्रीय महामार्ग २११ची भूसंपादन प्रक्रिया जवळपास संपली आहे.
मराठवाड्यात राष्ट्रीय महामार्ग भूसंपादनात घोटाळा झाल्याच्या तक्रारींची मालिका सध्या सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग २११ सोलापूर - बीड - औरंगाबाद - धुळे या महामार्गाच्या भूसंपादनात झालेल्या गैरप्रकाराची चौकशी सुरू आहे. मध्यंतरी औरंगाबाद येथील जल व भूमी व्यवस्थापन संस्थेची जमीन हडपण्यात आल्याचे प्रकरण समोर आले होते. तत्पूर्वी राष्ट्रीय महामार्ग २११मध्ये सुमारे १५० कोटींच्या आसपास रक्कम महामार्गालगत जमिनी दाखवून वाटप करण्यात आल्याचे प्रकरण समोर आले. या सगळ्या प्रकरणांची सध्या चौकशी सुरू केली आहे.
नांदेड येथील राष्ट्रीय महामार्ग ३६१मध्ये भूसंपादनाचा मोबदला ४४० कोटींपर्यंत देण्यात आला असून, १०० कोटींचा मोबदला चुकीच्या पद्धतीने आणि शासकीय जमिनींच्या मोबदल्यात देण्यात आल्याची तक्रार शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रकाश मारावार यांनी विभागीय आयुक्तांकडे पुराव्यानिशी केली आहे. या सगळ्या प्रकरणामुळे तेथील उपविभागीय अधिकारी आणि भूसंपादन प्रक्रियेतील यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ९९८ कोटी रुपये एकूण भूसंपादन मोबदला असून, नांदेड - अर्धापूरमधील २५ गावांमधून हा महामार्ग जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने भूसंपादन निवाडे आणि सुनावणी बंद होती. मात्र, असे असताना उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनात सुनावण्या झाल्या. लॉकडाऊनचा गैरफायदा घेत शासकीय जमिनी खासगी मालकीत दाखवून मोबदला देण्यात आल्याची तक्रार आहे.
विभागीय आयुक्तांची माहिती अशीविभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सांगितले, या तक्रारीप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशीअंती जे सत्य असेल ते समोर येईल.
एनएच २११ प्रकरणात सुरू आहे चौकशीराष्ट्रीय महामार्ग २११मध्ये महामार्गालगत जमिनी दाखवून १४० कोटींहून अधिक रक्कम वाटल्याचे प्रकरण ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणल्यानंतर आयुक्तांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे.