छत्रपती संभाजीनगर : चंपा चौक ते जालना रोड (आकाशवाणीसमोर) हा रस्ता करण्यासाठी मागील दोन दशकांपासून महापालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. प्रत्येक वेळेस नवीन विघ्न येत असल्याने रस्ता होत नाही. नवीन विकास आराखड्यातही हा रस्ता १०० फूट दर्शविण्यात आला असून, तो करण्यासाठी प्रशासन पुन्हा एकदा सरसावले असून किमान ६०० ते ७०० घरांमध्ये राहणारे नागरिक बेघर होतील.
मनपा प्रशासक जी. श्रीकांत मागील दीड वर्षापासून केंद्रीय पद्धतीने शहराच्या सर्वांगीण विकासावर भर देत आहेत. त्यात विकास आराखड्याची अंमलबजावणी हासुद्धा एक विषय आहे. ३३ वर्षांनंतर शहराला विकास आराखडा मिळाला. त्यातील महत्त्वाच्या रस्त्यांची अंमलबजाणी करण्याचे ठरविण्यात आले. जुन्या शहराला जोडणारा रस्ता म्हणजे चंपा चौक ते जालना रोड होय. रेंगटीपुरा, दादा कॉलनी आदी भागांतून जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे नियोजन आहे. महापालिकेच्या विभागप्रमुखांच्या बैठकीत प्रशासक जी. श्रीकांत यांनी याबद्दलचा निर्णय घेतला.
हा रस्ता जुन्या विकास आराखड्यातही दर्शविण्यात आला होता. दोन दशकांपासून या रस्त्याच्या रुंदीकरणाची चर्चा सुरू होती. प्रशासनाने सर्वेक्षण करून किती घरे बाधित होतील, याचा अंदाज घेतला होता. ५०० ते ७०० घरे बाधित होतील असे लक्षात आल्यावर रुंदीकरणाचा विषय मागे ठेवण्यात आला होता. अनकेदा राजकीय मंडळींनीही आपले मतदार डोळ्यासमोर ठेवून या रस्त्याला विरोध केला होता. आता पुन्हा हा विषय ऐरणीवर आला आहे.
काय फायदा होईल?चंपा चौक ते जालना रोड हा रस्ता झाल्यास वाहनधारकांना थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून जालना रोडकडे येता येईल. सध्या अनेकजण टीव्ही सेंटर, जुना मोंढा, शिवाजी हायस्कूलमार्गे जालना रोडवर येतात. जुन्या शहरातील नागरिकांसाठी हा रस्ता बराच उपयुक्त ठरणार आहे.