औरंगाबाद : एसटी महामंडळाने औरंगाबाद, दापोडी आणि नागपूर कार्यशाळेतून १०० नव्या बस बांधून घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये औरंगाबादच्या कार्यशाळेत ३० साध्या बसच्या बांधणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये औरंगाबादहून १५ जुलैपर्यंत २५ बस बांधणीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
वाढलेले डिझेल दर, सुट्या भागांची दरवाढ यांसह अनेक कारणांमुळे एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती बेताची झाली. यात चार वर्षांपूर्वी मध्यवर्ती कार्यशाळेला नवीन चेसिसचा पुरवठा थांबविण्यात आला. त्यामुळे कार्यशाळेत नव्या बसची निर्मिती ठप्प झाली.
या काळात नवीन बसेसऐवजी केवळ जुन्या बसेसच्या पुनर्बांधणीवर भर देण्यात आला. त्यानंतर दीड वर्षापूर्वी चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत स्टील बॉडीच्या (माईल्ड स्टील) बस बांधणीला सुरुवात झाली; परंतु नव्या चेसिसअभावी जुन्या बसगाड्यांचा त्यासाठी वापर करण्यावर भर देण्यात आला. त्यामुळे जुन्या लाल बसच्या सांगाड्यावर स्टील बॉडीच्या बसेसनी आकार घेतला.
कार्यशाळेत बऱ्याच वर्षांनंतर आता पुन्हा एकदा नव्या चेसिसचा पुरवठा सुरू झाला आहे. त्यामुळे आता पुन्हा एसटी महामंडळाच्या कार्यशाळेत बांधण्यात आलेल्या नव्या बसगाड्या प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
आषाढी वारीची परंपराआषाढी वारीच्या निमित्ताने दरवर्षी पंढरपूरसाठी नव्याने बांधणी केलेल्या बस सोडण्यात येत असे; परंतु चेसिसअभावी नव्या बसची निर्मितीच झाली नसल्याने गेली चार वर्षे नव्या बस सोडण्याच्या एसटी महामंडळाच्या परंपरेत खंड पडला. यावर्षी आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर नव्या चेसिस कार्यशाळेत दाखल झाल्या. त्यामुळे ही परंपरा पुन्हा एकदा सुरूहोण्याची चिन्हे आहेत.