छत्रपती संभाजीनगर : सिडको एन २ भागातील ज्ञानेश विद्या मंदिर शाळा १०० टक्के अनुदानित असताना विद्यार्थ्यांकडून दरवर्षी ३ हजार ते साडेचार हजार रुपयांपर्यंत शुल्क उकळण्यात येत असल्याचा प्रकार गटशिक्षणाधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीतून समोर आला आहे. याविषयी विविध सामाजिक संस्था, संघटनांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली होती.
सिडको एन-२ भागात उन्नती शिक्षण प्रणित ज्ञानेश विद्या मंदिर ही पाचवी ते दहावीपर्यंतची शाळा आहे. या शाळेतील मूळ वर्ग व २ अतिरिक्त तुकड्या १०० अनुदानित आहेत. त्याचवेळी ८ ते १० वी तिसरी तुकडी अंशत: अनुदानित आहे. शाळेत विद्यार्थ्यांकडून शुल्क वसुलीसह इतर गैरप्रकार करण्यात येत असल्याच्या तक्रारी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे केल्या होत्या. त्यावर शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना चौकशीसाठी शाळेत पाठविले. त्या सर्व तक्रारींची गटशिक्षणाधिकाऱ्यांनी चारवेळा चौकशी केली. त्यात विद्यार्थ्यांकडून शुल्क वसूल करण्यात येत असल्याच्या आरोपांबाबत गटशिक्षणाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला तेव्हा विद्यार्थ्यांनी पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी ३ हजार रुपये, नववीच्या विद्यार्थ्यांकडून ३ हजार ५०० आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी ४ हजार ५०० रुपये घेण्यात येत असल्याचे सांगितले. मात्र, शुल्क दिल्याचे किंवा घेतल्याचे कोणतेही कागदपत्रे, पावत्या शाळेकडून किंवा विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या नाहीत तसेच इतर आक्षेपांबाबत कोणतेही पुरावे सापडले नसल्याचेही अहवालात म्हटले आहे.
खंडणी उकळण्यासाठी हा उपद्व्यापमागील काही वर्षांपासून शिक्षण विभागाकडे तक्रारी करणारे व्यक्ती खंडणी उकळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशा लोकांमुळे शाळा चालविणे कठीण बनले आहे. शाळेत कोणताही नियमबाह्य प्रकार सुरू नाही. विद्यार्थ्यांकडून शुल्कही घेतले जात नाही तसेच माझ्या नियुक्तीला दिलेली मान्यता रद्द करण्यासाठी याच तक्रारदारांनी शिक्षण विभागात दबाव निर्माण केला. त्यानंतर मान्यता रद्द केली. मात्र, त्यास न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे.- आशा पऱ्हे, माध्यमिक शिक्षिका तथा संस्था सचिव