औरंगाबाद : मराठवाड्यातील आठपैकी सात जिल्ह्यांत १०० टक्क्यांवर पाऊस झाला आहे. फक्त परभणीत जिल्ह्यात ८९ टक्के पाऊस आजवर झाला आहे. विभागात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ११७ टक्के पाऊस झाला आहे. सर्वत्र पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. १७ सप्टेंबर रोजी विभागात ४.४ मिलिमीटर पाऊस झाला.
औरंगाबाद जिल्ह्यात ११६ टक्के, जालना ११३ टक्के, बीड ११४ टक्के, लातूर ११०, उस्मानाबाद ११५, नांदेड १३३ टक्के, तर हिंगोलीत ११३ टक्के पाऊस झाला आहे. मराठवाड्याची वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६७९.५ मिमी आहे. आतापर्यंत ७२० मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी आजपर्यंत ८१९ मिमी, म्हणजेच १३३ टक्के पाऊस झाला होता.
जुन, जुलै व ऑगस्ट महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे सात लाख ३६ हजार १३३.३८ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झाले. आता सप्टेंबरमध्ये पावसाचा मुक्काम लांबणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. अंदाज खरा ठरला तर विभागातील हाताशी आलेली खरीप हंगामातील पिके वाया जाण्याची शक्यता आहे.
८७३ जल प्रकल्पांत ८० टक्के पाणीमराठवाड्यातील ८७३ जल प्रकल्पांत सध्या ८० टक्के जलसाठा आहे. मोठ्या ११ प्रकल्पांत ९२ टक्के जलसाठा असून, जायकवाडीचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. ७५ मध्यम प्रकल्पांत ७३ टक्के, ७४७ लघू प्रकल्पांत ४९ टक्के, गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यांत ४९ टक्के, तर तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील बंधाऱ्यांत ६६ टक्के, असा ८० जलसाठा प्रकल्पांत आहे.