औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाच्या एकूण मृत रुग्णांची संख्या रविवारी १ हजार झाली. १८९ दिवसांत कोरोनाने १ हजार लोकांना प्राण गमवावे लागले. धक्कादायक म्हणजे १५२ दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनामुळे दररोज मृत्यू होत आहेत. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यास आरोग्य यंत्रणेला आता कुठे यश येत आहे; परंतु एखाद्या आजाराने एवढ्या कमी दिवसांत इतक्या मोठ्या संख्येने नागरिकांचे बळी जाणे, हे दुदैर्वी आहे.
जिल्ह्यात १५ मार्च रोजी पहिल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचे निदान झाले होते. त्यानंतर ५ एप्रिल रोजी कोरोनामुळे एका बँक अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. मराठवाड्यात कोरोनाचा हा पहिला बळी ठरला होता. ५ एप्रिल ते १२ मेदरम्यान कोरोनामुळे एकूण १७ जणांचा मृत्यू झालेला होता. मात्र, १३ मेपासून कोरोनामुळे प्रत्येक दिवस घातवार ठरत आहे. कारण या दिवसापासून जिल्ह्यात रोज कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होत आहे. अवघ्या ७ महिन्यांच्या कालावधीत मृत्यूच्या संख्येने एक हजाराचा आकडा गाठला.
कोरोनाविरुद्ध खाजगी असो अथवा शासकीय रुग्णालये, सर्व जण कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी ७ महिन्यांपासून दिवस-रात्र लढा देत आहेत. या सगळ्यात आता कुठे रुग्णसंख्या कमी होत असल्याने दिलासा मिळत आहे; परंतु मृत्यू काही केल्या थांबताना दिसत नाही. या परिस्थितीवर नियंत्रण कसे आणायचे आणि मृत्यू का वाढत आहेत, असा प्रश्न आरोग्य यंत्रणेलाही पडत आहे.
एका रुग्णाची आत्महत्याघाटीत उपचार सुरू असताना एका कोरोनाबाधित रुग्णाने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना २७ सप्टेंबर रोजी घडली. जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या मृत रुग्णांच्या माहितीत या रुग्णाचा समावेश केलेला नाही. हा आत्महत्या केलेला रुग्ण धरून एकूण १ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पहिल्या मृत रुग्णाचा मुलगा म्हणाला...मृत्यूच्या वाढत्या परिस्थितीला जेवढे प्रशासन जबाबदार आहे, तेवढेच नागरिकही जबाबदार आहेत. कारण एकीकडे प्रशासनाने अनलॉक केले आणि दुसरीकडे नागरिकांनी प्रोटोकॉलचे पालन न करता बाहेर पडायला सुरुवात केली. परिणामस्वरूप सद्य:स्थिती आपल्यासमोर आहे. राहिला प्रश्न जबाबदार कोणाला ठरवायचे, तर याच विचारात गुंतून राहिलो तर जबाबदारी घेणारेसुद्धा राहणार नाहीत. परिस्थितीची दाहकता प्रत्येकालाच समजणे अत्यंत गरजेचे आहे. त्या दिशेने आपली आणि आप्त जणांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
असा राहिला मृत्यूदरजिल्ह्यात ५ एप्रिल ते १२ मेदरम्यान कोरोनामुळे एकूण १७ जणांचा मृत्यू झाला होता. या तारखेपर्यंत कोरोनाचा मृत्यूदर २.५२ टक्के होता. मात्र, जून महिन्यात मृत्यूदर ५.४१ टक्क्यांवर गेला. त्यानंतर १५ जुलै रोजी मृत्यूदर ३.९१ टक्क्यांवर आला. आता मृत्यूदर २.८० टक्के आहे. मृत्यूदर कमी होत असला तरी कोरोनामुळे दररोज मृत्यू होतच आहेत.
पूवीर्पेक्षा मृत्यूदर कमीकोरोनाच्या सुरुवातीच्या काळात मृत्यूदर अधिक होता; परंतु मृत्यूदर आता खूप कमी झालेला आहे. रुग्णांच्या उपचारासाठी विविध औषधी, इंजेक्शन उपलब्ध झालेले आहेत. आगामी कालावधीत मृत्यूदर आणखी कमी होईल.- डॉ. स्वप्नील लाळे, आरोग्य उपसंचालक
रुग्ण गंभीर अवस्थेत येतातकोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ७ महिन्यांपासून प्रत्येकाकडून दिवस-रात्र परिश्रम घेतले जात आहे. रुग्ण गंभीर अवस्थेत दाखल होतात. ग्रामीण भागातूनही रुग्ण शहरात येतात, याचाही विचार करण्याची गरज आहे. रुग्णांनी वेळीच उपचार घेण्याची गरज आहे.- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)
भीतीपोटी दुर्लक्षरुग्णांसाठी सध्या आॅक्सिजन, व्हेंटिलेटर बेड पुरेसे उपलब्ध आहेत. रुग्णांनी कमी त्रास असताना तात्काळ उपचार घेण्यास प्राधान्य दिले पाहिजे. अनेक जण भीतीपोटी वेळीच उपचार घेण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यातून आजाराचे स्वरूप गंभीर होते.-डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा