छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चालल्या असून त्यावर उपाययोजनांसाठी आजवर केलेले सर्व प्रयत्न वाया गेले आहेत. यामुळे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी विभागातील २१ लाख शेतकरी कुटूंबांचा सर्व्हे करण्यास सुरूवात केली आहे. आजवर सुमारे ५ लाख कुटूंबांंचा सर्व्हे पूर्ण झाला आहे.
कमी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमते अभावी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष प्रशासनाने काढला आहे. सर्व्हे पुर्ण झाल्यानंतर अंतिम निष्कर्षासह शासनाकडे शेतकऱ्यांना दोन्ही हंगामात एकरी दहा हजार रुपयांचे अर्थसहाय्य करण्याची शिफारस करण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत हा सर्व्हे १२ टप्प्यात होत आहे. थेट शेतकऱ्याशी संवाद साधला जात असून, यात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासोबतही संवाद साधण्यात येत आहे. मराठवाड्यातील जिल्हाधिकारी, जि.प.सीईओंचे पथक स्वतः शेतकऱ्याच्या घरी जाऊन सर्व्हे करीत असून सर्व्हेचा फॉर्म भरण्यासाठी अर्धा तास लागतो आहे. जून अखेरपर्यंत सर्व्हे पुर्ण होईल.
सर्व्हेमधून काय समोर येत आहे.....शेतकऱ्यांची मानसिक कशी आहे, यावरून शेतकरी आत्महत्या करू शकतो का, याचा अंदाज येत आहे. सोमवारी चार कुटुंबाना कार्यालयात बोलून त्याची माहिती घेतली, त्यांची खूप वाईट परिस्थिती आहे. मुली लग्नाला आल्या आहेत, आर्थिक परिस्थिती वाईट आहे, सावकारी कर्ज आहे, बँक कर्ज आहे. आत्महत्या करण्याच्या मार्गावर शेतकरी जात आहे, याची माहिती काढायची आहे. त्यामुळे सर्व्हे सुरू आहे. ज्या शेतकऱ्याच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार आहे, त्यांना बोलावून समुपदेशन करण्यात येत आहे. सर्व्हेचा ऑनलाइन डेटा जमा केला जात आहे, असे केंद्रेेकर यांनी सांगितले.
तेलंगणाप्रमाणे शेतकऱ्यांना रोख पैसे मिळावेतशेतकरी आत्महत्याचे मुख्य कारण आर्थिक परिस्थितीच आहे. शेती पिकत नाही, पिकल्यावर भाव मिळत नाही, शेती कामासाठी पैसे लागतात, शेतकऱ्यांना उधार मिळणाऱ्या खतावर दुकानदार व्याज लावत असल्याचा धक्कादायक प्रकार सर्व्हेतून समोर आला आहे. मुलांचे लग्न होत नसल्याने नैराश्य येत आहे. आयुष्य अंधारमय असल्याचे शेतकर्यांना वाटत आहे. त्यामुळे ठोक मदत देण्यात यावी याबाबत मुख्यमंत्री आणि वरिष्ठांना सुचविणार आहे. दोन हंगामात एकरी २० हजार रोख रक्कम दिली तर शेतकरी आत्महत्या थांबू शकते वाटते. तेलंगणा प्रमाणे शेतकऱ्यांना नगद पैसे मिळाल्यास शेतकरी आत्महत्या रोखता येतील. असे केंद्रेकर यांनी सांगितले.
कसा सुरू आहे सर्व्हेप्रश्नांचे एकूण बारा विभाग असून यात १०४ प्रश्नांची माहिती भरून घेण्यात येत आहे. आत्महत्या करण्याच्या विचार येणाऱ्या शेतकऱ्यांची वेगळी यादी होत आहे. शेतकऱ्यांची प्राथमिक, कौटुंबिक माहिती, आर्थिक अडचण, कर्जामुळे कौटुंबिक कलह, व्यसन, बेरोजगारांची संख्या, घरगुती सुविधा, वीज, गॅस, नळ शौचालय आहे काय. तसेच कुटुंबातील कोणी ग्रामपंचायत, सोसायटी, स्वराज्य संस्था, बचतगट सदस्य आहे का, राष्ट्रीय बँकेचे, सहकारी बँक, सावकारी कर्ज आहे का आदी प्रश्नांची माहिती सर्व्हेतून घेण्यात येत आहे.