तालुक्यातील सहकार विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या १०२ विविध संस्थांच्या संचालक मंडळाचा कार्यकाल संपलेला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत. या संस्थांना शासनाने मुदतवाढ दिली होती; पण आता कोरोनाचा प्रार्दुभाव कमी होत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे या संस्थांच्या निवडणुका घेण्यासंदर्भात राज्य सरकारने हिरवा कंदील दिलेला आहे. मात्र, निवडणूक प्राधिकरणाच्या निर्णयाची या संस्थांना प्रतीक्षा आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव होण्यापूर्वीच ४४ सहकार संस्थांची निवडणूक प्रक्रिया करण्याचे काम सहकार विभागाच्या वतीने हाती घेण्यात आले होते; पण कोरोनामुळे हा निवडणूक कार्यक्रम अर्धवट पडून आहे. १०२ सहकारी संस्थांच्या निवडणुकीची पुढील प्रक्रिया निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशानुसार केली जाईल, अशी माहिती सहायक निबंधक विष्णुपंत रोडगे यांनी दिली.
चाैकट...
निवडणुकीत पात्र संस्था
फुलंब्री तालुक्यातील एकूण १०२ सहकार संस्था निवडणुकीस पात्र आहेत. यात विविध कार्यकारी संस्था (सोसायट्या) ४३ आहेत, तर मजूर संस्था-२३, सुशिक्षित बेरोजगार संस्था-२८, औद्योगिक संस्था-२, खरेदी विक्री संघ-१, नागरी पतसंस्था-४ तसेच १ शिक्षक पतसंस्थेचा समावेश आहे.