नांदेड- जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. गटातटाच्या राजकारणामुळे अनेक गावांत या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. असे असताना १०३ ग्रामपंचायतींनी मात्र ही निवडणूक बिनविरोध केली आहे. आता उर्वरित ९१० ग्रामपंचायतींसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. १५ जानेवारी रोजी या ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे.
निवडणूक आयोगाने घोषित केल्यानुसार जिल्ह्यातील १ हजार १३ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी दिलेल्या मुदतीत तालुकास्तरावर मोठी गर्दी झाली होती. या ठिकाणी कोरोनाच्या नियमांची सर्रासपणे पायमल्ली करण्यात आली. ग्रामीण भागातील राजकारणाचा पाया असलेल्या ग्रामपंचायतींची सत्ता काबीज करण्यासाठी राजकीय पक्षांसह अनेक संघटनांनीही कंबर कसली आहे. शेकडोंच्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने चुरस निर्माण झाली होती; परंतु गावातील एकोपा टिकून रहावा, वादविवाद होऊ नये यासाठी प्रशासन आणि ग्रामस्थांनी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न केले. काही ठिकाणी त्याला यशही आले. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल १०३ ग्रामपंचायती बिनविराेध निघाल्या आहेत. यात नांदेड तालुक्यातील ७, अर्धापूर ६, भोकर १२, मुखेड ५, हदगाव १३, हिमायतनगर ३, किनवट २, धर्माबाद ३, उमरी ९, बिलोली ४, नायगाव ५, देगलूर ८, मुखेड ६, कंधार १३ आणि लोहा तालुक्यातील सात ग्रामपंचायतींचा समावेश आहे. हदगाव, कंधार आणि भोकर तालुक्यांनी जास्तीत जास्त ग्रामपंचायती बिनविरोध काढण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
जिल्ह्यातील उर्वरित ९१० ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. अनेक ठिकाणी तरुण या निवडणुकीत उतरले आहेत. तर कुठे गटातटाच्या राजकारणामुळे पॅनल उभे राहिले आहेत. जुन्या लोकांना बाजूला सारून नवखी मंडळी राजकारणात आली आहे. त्यामुळे अनेक प्रस्थापितांना धक्का बसला आहे.