औरंगाबाद : रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा कायम असून, १०३ हॉस्पिटल्सना बुधवारी ७०४ इंजेक्शनचा तुटपूंजा पुरवठा करण्यात आला. शहर आणि ग्रामीण भागातील रुग्णालयांना मागणीच्या तुलनेत एक किंवा दोन इंजेक्शन देण्यात आले आहेत, त्या रुग्णालयात गंभीर रुग्णांचा आकडा मोठा आहे. मागणी आणि पुरवठ्यात तफावत झाल्यामुळे इंजेक्शन मिळणे दुर्मीळ झाले असून, रुग्ण नातेवाइकांची धावपळ काही केल्या थांबेना.
१०३ खासगी रुग्णालयात २८४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ३०२ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. १ हजार १६ रुग्ण आयसीयूमध्ये आहेत, तर १७८५ रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनची आवश्यकता असल्याची नोंदणी खासगी रुग्णालयांनी जिल्हा प्रशासनाकडे नोंदविली होती. ५ दिवसांत ६ इंजेक्शन एका रुग्णाला देण्यात येत आहेत. त्यानुसार १७८५ रुग्णांना ८ हजार ९२५ इंजेक्शनची गरज असताना फक्त ७०४ इंजेक्शन देण्यात आले. इंजेक्शनच्या वितरक एजन्सीमार्फत ते खासगी रुग्णालयांपर्यंत पोहोचविल्याचे अहवाल जिल्हा प्रशासनाने दिला आहे. इंजेक्शन कमी पडत असल्यामुळे रुग्णालय हतबल झाले होते. कुठेही इंजेक्शन उपलब्ध नसल्यामुळे रुग्ण नातेवाइकांची धावपळ सुरूच होती.