- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : देशभरात ५० खाटांचे १०५ आयुष रुग्णालये ( AYUSH Hospitals ) उभारण्यात येत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हे रुग्णालय उभारण्यात येतात. केंद्र सरकारकडून निधी दिला जातो, तर राज्य सरकार उभारणी केली जाते. राज्य सरकारकडून प्रस्ताव आल्यास औरंगाबादेतही हे रुग्णालय होईल. त्यादृष्टीने चर्चा केली जाईल, असे आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा म्हणाले.
वैद्य राजेश कोटेचा यांनी बुधवारी डाॅ. हेडगेवार रुग्णालयास भेट दिली. त्या वेळी ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. प्रारंभी राजेश कोटेचा यांचा रुग्णालयातर्फे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी आयुष्य मंत्रालयाचे सल्लागार डाॅ. मनोज नेसरी, डाॅ. सतीश कुलकर्णी, डाॅ. अनंत पंढरे, डाॅ. राजश्री रत्नपारखी, डाॅ. अश्विनीकुमार तुपकरी आदी उपस्थित होते.
कोटेचा म्हणाले, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता कमी आहे. मात्र, तिसरी लाट येणारच नाही, असेही म्हणता येणार नाही. तिसऱ्या लाटेसाठी तयारी करण्यात आली असून, केंद्र सरकार त्यासाठी सज्ज आहे. कोरोना प्रादुर्भावात इतर उपचार पद्धतींबरोबर आयुर्वेदानेही महत्त्वाची भूमिका निभावली आहे. अनेक अभ्यासातून ते सिद्ध झाले आहे, असे कोटेचा म्हणाले. इंटिग्रेटिव्ह मेडिसिनची आज गरज असून त्यात मोठे काम करण्याची देशात क्षमता असल्याचेही ते म्हणाले.