छत्रपती संभाजीनगर: केंद्रीय प्रदूषण नियंत्रण यांच्या निर्देशानुसार महानगरपालिकेच्यावतीने शहरातील विविध ठिकाणी प्रतिबंधित प्लॅस्टिकवर कारवाई करण्यात आली. दोन दिवसांत पथकाने तब्बल १०७ किलो प्लॅस्टिक जप्त केले असून विक्रेत्यांकडून ५१ हजारांचा दंड देखील वसूल करण्यात आला आहे.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या आदेशानुसार, उपआयुक्त तथा घन कचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीने प्रतिबंधित प्लॅस्टिकवर संयुक्त कारवाई करण्यात येत आहे.पथकाने झोन न. ०७ व झोन न. ०२ अंतर्गत त्रिमूर्ती चौक व शहागंज, गुलमंडी, पैठण गेट या ठिकाणी होलसेल दुकानांवर दि. २० व २१ एप्रिल रोजी प्रतिबंधित प्लॅस्टिकवर कारवाई केली. यावेळी जवळपास १०७.०३ किलो प्रतिबंधित प्लॅस्टिक जप्त करून विक्रेत्यांकडून ५१,५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई मनपा नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव यांच्या नेतृत्वाखाली नागरी मित्र पथकाचे कर्मचारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पुणे विभागाचे क्षेत्र अधिकारी डॉ. स्नेहल कोसे, दीपक बनसोड यांनी केली.