लातूर : लातूर व औसा तालुक्यात १५ व १६ मार्च रोजी रोजी गारपीट झाली होती. या गारपिटीत औसा तालुक्यात १६ हजार २३९.८५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, ११.६४ कोटी रुपयांना फटका बसला आहे, तर लातूर तालुक्यात १० हजार ७४१ हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र त्याचा अद्याप पाहणी अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर झाला नसल्याने नुकसानीच्या मागणीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला नाही.लातूर जिल्ह्यातील औसा व लातूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली होती. या गारपिटीत गहू, हरभरा, ज्वारी, करडई, केळी, हळद, भुईमूग व अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले. कृषी राज्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. आठ दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र १५ दिवस उलटले तरी अद्याप लातूर तालुक्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेला नाही. कृृषी, महसूलच्या संयुक्त पथकांकडून पंचनामे करण्याच्या सूचना होत्या. त्यानुसार औसा तालुक्यातील पंचनाम्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला असून, १६ हजार २५९.८५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. या तालुक्यात गहू ३३१७.३२ हेक्टर, हरभरा ४०२४.१ हेक्टर, ज्वारी ५८४६.०९ हेक्टर,करडई ९७०.६४ हेक्टर, केळी ३.४० हेक्टर, हळद ३.५०, भुईमूग २८१.३८ हेक्टर व इतर क्षेत्र ४५७.७५ हेक्टर बाधित झाले आहे. ११ कोटी ६४ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे या अहवालात म्हटले आहे. जिल्हा प्रशासनाकडे औसा तालुक्याचा हा अहवाल गुरुवारी प्राप्त झाला असून, शासनाकडे नुकसानभरपाईसाठी ११.६४ लाखांची मागणी केली जाणार आहे.
गारपिटीमुळे औशात ११ कोटींचे नुकसान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2017 12:13 AM