सुमित डोळे, लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर: गुंतवणुकीवर अधिक व्याज, दामदुप्पट परतावा, शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसारख्या आर्थिक प्रलोभनातून शहरात गेल्या ९ महिन्यांत तब्बल ६६९ कोटी ८१ लाख ८१ हजार रुपयांचे ११ घोटाळे उघड झाले. या घोटाळ्यांत ८० टक्के रक्कम मागील अवघ्या ५ वर्षांमध्ये लुटली गेली.
जवळपास ९० पेक्षा अधिक आरोपींवर गुन्हे दाखल झाले. ३४ घोटाळेबाज कारागृहात आहेत. संचालक मंडळासोबत सहकार खात्याच्या उपनिबंधक कार्यालयाचेही या घोटाळ्यात मोठ्या प्रमाणात हात बरबटल्याचे आता निष्पन्न हाेत आहे. ११ पैकी केवळ ५ घोटाळ्यांतच दोषारोपपत्र सादर झाले आहे. सर्वप्रथम ११ जुलै रोजी अंबादास मानकापेचा आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचा २०२ कोटींचा घोटाळा समोर आला. त्यानंतर पुढील ८ महिन्यांत कोट्यवधींचे १० घोटाळे उघडकीस आले. यापैकी गुंतवणूकदारांनी मोठा लढा उभारल्याने आदर्श घोटाळ्याचा तपास वेगाने झाला.
तक्रारी होताच आरोपी विदेशात
- आभाचा पंकज चंदनशिव व देवाई महिला नागरी पतसंस्थेचा महादेव काकडेचा अद्यापही पोलिस शोध घेऊ शकलेले नाहीत. पोलिसांकडे तक्रार जाताच दोघेही विदेशात पळून गेल्याचा दाट संशय असून
- थायलंडमध्ये ते लपल्याचा अंदाज आहे. पोलिसांनी केंद्राकडे त्यांच्याबाबत रेड कॉर्नर नोटीस काढण्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे.
९९ कोटींपैकी ५७ कोटींसाठी प्रस्ताव
मानकापेची ९९ कोटींची संपत्ती मिळून आली असून, त्यापैकी ५७ कोटी ४४ लाखांची संपत्ती संरक्षित करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला.
या घोटाळ्यांत सर्वसामान्यांचे पैसे अडकले आहेत. प्रत्येक गुन्ह्याचा सखोल तपास सुरू आहे. गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळविण्यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करत आहोत. - संभाजी पवार, पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा.
कुठे किती रुपयांचा घोटाळा?
- आदर्श नागरी सहकारी पतसंस्था १,९७,०४,६६,०१६ रुपये
- आदर्श महिला नागरी सहकारी बँक ३४,७०,००,४३९ रुपये
- अजिंठा अर्बन को. ऑप. बँक लि. ९७,४१,००,००० रुपये
- औरंगाबाद जिल्हा आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ४,०६,२२,२०५ रुपये
- आभा इन्व्हेस्टमेंट अँड लँड डेव्हलपर्स २,३०,००,००० रुपये
- ज्ञानोबा अर्बन क्रेडिट को. ऑप. साेसायटी २९,०५,८९,२०५ रुपये
- यशस्विनी महिला स्वयंसहाय्यता गट सहकारी प. ४७,८२,००,००० रुपये
- देवाई महिला नागरी पतसंस्था २२,००,००,००० रुपये
- जय किसान जिनिंग अँड प्रेसिंग संघ, करमाड ३५,९०,१९,९९१ रुपये
- जिल्हा कृषी औद्योगिक बहुउद्देशीय सहकारी संस्था २,८८,१७,५९३ रुपये