औरंगाबाद : शहराच्या वेगवेगळ्या भागात उभ्या असलेल्या वाहनांच्या बॅटरी चोरी करून विक्री करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीच्या ११ बॅटरी आणि रिक्षा असा सुमारे सव्वा लाखाचा ऐवज जप्त केला.
गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुरेश वानखेडे यांनी सांगितले की, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अमोल देशमुख, सय्यद मुजीब अली, भावसिंग चव्हाण, राहुल खरात आणि सुनील मोरे हे गस्तीवर असताना शहागंज येथे रिक्षातून दोन जण चोरीच्या बॅटऱ्या विक्री करण्यासाठी नेत असल्याची माहिती त्यांना खबऱ्याने दिली. यानंतर पथकाने शहागंज येथे सापळा रचून संशयित रिक्षा पकडली तेव्हा त्या रिक्षात वाहनांच्या जुन्या अकरा बॅटऱ्या आढळून आल्या. रिक्षातील दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांनी अधिक चौकशी केली असता शहराच्या वेगवेगळ्या भागात उभ्या वाहनांच्या बॅटऱ्या चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली. पोलिसांनी दोन्ही मुले, बॅटऱ्या, रिक्षा सिटी चौक पोलिसांच्या ताब्यात दिले.