औरंगाबाद : वर्षभरापूर्वी वाल्मीच्या तलावात बुडून मरण पावलेल्या ११ वर्षीय मुलाचा त्याच्या सोबतच्या ९ ते १४ वर्ष वयाच्या मुलांनीच बुडवून खून केल्याची तक्रार मृताच्या मातेने सातारा ठाण्यात नोंदविली. सातारा पोलिसांनी १३ जुलै रोजी संशयित मुलांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
तक्रारदार प्रतिभा दत्ता शिंदे (रा. ईटखेडा) यांचा मोठा मुलगा रोहन दत्ता शिंदे (वय ११) हा २५ ऑगस्ट २०२० रोजी वाल्मीच्या तलावात बुडून मरण पावला होता. या प्रकरणी सातारा ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद पोलिसांनी केली होती. रोहनसोबत तलावावर गेलेल्या अवधूत जगदाळे, नितीन, रोशन आणि बेबी (पूर्ण नाव कळू शकले नाही) यांच्याकडून आईने घटनेची माहिती घेतली. त्यानुसार, ते सर्व जण तलावावर गेले तेव्हा तेथे आधीच कॉलनीतील १४ वर्षांचा मुलगा पोहत होता. त्याने जुन्या वादातून रोहनसोबत वाद घातला. त्याने तीन जणांना धक्का देऊन तलावात पाडले. रोहन तलावातून बाहेर येण्याचा प्रयत्न करीत असताना त्याने रोहनच्या डोक्यावर हात ठेवून त्यास पाण्यात बुडवले. या घटनेची कुणाला माहिती दिली तर जीवे मारीन, अशी धमकी त्याने दिली होती, असे त्या बालकांनी सांगितल्याचे प्रतिभा यांनी तक्रारीत नमूद केले.
यापूर्वी सातारा पोलिसांनी त्यांच्या तक्रारीनुसार खुनाचा गुन्हा नोंदविण्यास नकार दिला होता. यामुळे त्यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात तक्रार केली होती. न्यायालयाने गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश सातारा पोलिसांना दिले. त्यानुसार १३ जुलै रोजी सातारा ठाण्यात रोहनसोबत त्या दिवशी तलावावर गेलेल्या पाच अल्पवयीन मुलांविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. या घटनेची नव्याने चौकशी सुरू करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
वरिष्ठ अधिकाऱ्याची घटनास्थळी धावखुनाचा गुन्हा नोंद होताच पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहायक आयुक्त निशिकांत भुजबळ, पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, सहायक निरीक्षक सुनील कराळे आणि अन्य कर्मचाऱ्यांनी वाल्मी तलावाला मंगळवारी आणि बुधवारी सकाळी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.