औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील प्रसूतिशास्त्र विभागात गेल्या सहा महिन्यांत प्रसूतीपूर्व तपासणीसाठी आलेल्यांपैकी तब्बल ११० महिला कौटुंबिक अत्याचाराने पीडित असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. समुपदेशक आणि संरक्षक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांची अत्याचारातून सुटका होण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
घाटीतील प्रसूतिशास्त्र विभागात जागतिक आरोग्य संघटना आणि सेहत या संस्थेतर्फे कौटुंबिक अत्याचार आणि लैंगिक अत्याचारासंदर्भात प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पात प्रसूतिशास्त्र विभागात नियमित तपासणी आणि उपचारासाठी येणाºया महिलांना कौटुंबिक अत्याचारासंदर्भात माहिती दिली जाते. कुटुंबात कोणाकडून अत्याचार होतो का, यासंदर्भात विचारणा केली जाते. मागील सहा महिन्यांपासून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यातून ११० गरोदर मातांवर कौटुंबिक अत्याचार झाल्याची माहिती उघड झाली.
या प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी १९ जानेवारी रोजी जागतिक आरोग्य संघटनेच्या जिनेवा येथील डॉ. अवनी अमीन आणि सेहत संस्थेच्या डॉ. संजिदा यांनी प्रसूतिशास्त्र विभागाला भेट दिली. यावेळी गरोदर मातांच्या नोंदणीचा आढावा घेतला. घाटीत प्रसूतिसाठी येणाºया महिलांची संख्या पाहून त्या चकित झाल्या. रुग्णसेवेचा एवढा मोठा भार असताना अत्यंत कमी साधनांच्या आधारे चांगले काम सुरू असल्याचे त्या म्हणाल्या. येथील उदाहरण घेऊन चांगल्या सुविधा असलेल्या जगभरातील ठिकाणी काम करणे किती सोपे आहे, हेदेखील त्या म्हणाल्या. याप्रसंगी उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, प्रसूतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा, डॉ. भारत सोनवणे, डॉ. सोनाली देशपांडे, डॉ. विजय कल्याणकर आदींची उपस्थिती होती. वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास झिने, मेडिसिन विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांचीही पथकाने भेट घेतली.
मारहाण, पैशांसाठी छळकौटुंबिक अत्याचार पीडितांना जवळच्या व्यक्तीकडून मारहाण करणे, पैशांसाठी छळ करणे, त्याबरोबर भावनिक त्रास देण्याचा प्रकार होत असल्याचे या प्रकल्पाच्या माध्यमातून समोर येत आहे. महिलांना कायद्यासंदर्भात सजग करून अत्याचारातून मुक्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
कायद्याची माहितीसहा महिन्यांत ११० गरोदर महिला कौटुंबिक अत्याचाराने पीडित असल्याची नोंद झाली. या महिलांना कौटुंबिक अत्याचारासंदर्भात असलेल्या कायद्याची माहिती देण्यात आली. पोलिसांच्या सहभागाशिवाय समुपदेशक आणि संरक्षक अधिकाºयांच्या मदतीने वाद सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला.-डॉ. श्रीनिवास गडप्पा, विभाग प्रमुख, प्रसूतिशास्त्र विभाग, घाटी