फुलंब्री : येथील देवगिरी सहकारी साखर कारखाना कर्मचाऱ्याचे तेरा वर्षा पूर्वीचे भविष्य निर्वाह निधी व थकीत पगार ११ कोटी ५० लाख रुपये रुपये प्राप्त झाले असून ते ११०० कर्मचाऱ्यांना वाटप केले जात आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून आनंदाचे वातावरण आहे.
फुलंब्री व छत्रपती संभाजीनगर या दोन तालुक्याच्या कार्यक्षेत्रामधील शेतकऱ्यांच्या मालकीचा देवगिरी सहकारी साखर कारखाना हा एकमेव सहकारी कारखाना आहे. एकेकाळी फुलंब्री शहराच्या वैभवात भर पडणारा हा कारखाना राजकीय हस्तक्षेपामुळे बंद पडून कर्जबाजारी झाला. २०१२ पासून हा कारखाना बंद अवस्थेत आहे. येथे ११०० कर्मचारी काम करीत होते. त्या कर्मचाऱ्याचे २००० ते २०१२ पर्यंतचा पगार थकीत होता. तसेच भविष्य निर्वाह निधीची रक्कम ही त्या कार्यालयाला मिळाली नव्हती. गेल्या काही वर्षांपासून अवसायकच्या ताब्यात कारखाना आहे. दरम्यान, देवगिरी कारखान्याची जमीन समृद्धी महामार्गा मध्ये गेल्याने यातून २४ कोटी रुपये मिळाले होते. ही रक्कम ऋण वसुली प्राधिकरण विभागाकडे होती. थकीत पगार आणि भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळावी म्हणून कर्मचारी वर्गाकडून सतत मागणी केली जात होती. या मागणीचा अवसायक श्रीराम सोन्ने यांनी पाठपुरवा केला. यानुसार आता कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे थकीत वेतन व भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळाली आहे. देवगिरी कारखान्यामध्ये काम करणाऱ्या ११०० कर्मचाऱ्यांना थकीत पगारा पोटी साडेपाच कोटी रुपये प्राप्त झाले असून ते वाटप सुरु आहे. तसेच भविष्य निर्वाह निधीची देखील साडेपाच कोटी रुपये ही ऋण वसुली विभागाने सबंधित कार्यालयाला दिले. एकूण ११ कोटी रुपये प्राप्त झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याची माहिती कामगार प्रतिनिधी दादा सय्यद यांनी दिली.