राजेश खराडे , बीडजिल्ह्यात गतवर्षी पेक्षा कांदा लागवडीचे क्षेत्र निम्म्याहून कमी आले आहे. याचाच फटका व्यापारपेठांनाही बसणार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात वीस किलो प्रमाणे कांद्याचे दीडशे कोटी रुपयांचे उत्पन्न झाले होते. मात्र यंदा लागवड क्षेत्र कमी झाल्याने हेच उत्पन्न १५ रुपये किलो दराने ३५ कोटी ७५ लाखांवर येऊन ठेपले आहे. यामुळे जवळपास ११४ कोटी २५ लाखांचा फटका व्यापारपेठेला बसणार असल्याचे व्यापारी हफिज बागवान यांनी सांगितले. गतवर्षी जिल्ह्यात सहा हजार हेक्टरवर कांद्याची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे उत्पादनातही भरघोस वाढ झाली होती. जिल्ह्यातून चांगल्या प्रतीचा कांदा बंगरूळ , बेळगाव , सोलापूर, अहमदनगर, पुणे आदी ठिकाणी निर्यात केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनाही चांगला मोबदला मिळाला होता. मात्र यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांनी रबी, खरीप आणि उन्हाळी हंगामात कांदा लागवडीकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळेच जिल्ह्यात केवळ ११०० हेक्टरवर कांद्याची लागवड झाली आहे. उत्पादन घटीचे परिणाम सध्या बाजारपेठेवर जाणवू लागले आहे. ऐन हिवाळ्यातच कांद्याची आवक ग्रामीण भागातून घटली आहे. त्यामुळे व्यापारात मात्र चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. यंदा जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्याने कांदा आंतरपीकाच्या स्वरूपातही शेतकऱ्यांना परवडेना झाला आहे. दरवर्षी ग्राहक आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा कांदा यंदा मात्र व्यापाऱ्यांच्याच डोळ्यात पाणी आणणार आहे. कांद्यासाठी व्यापाऱ्यांना वनवन भटकंती करावी लागणार आहे. ही परिस्थिती जिल्ह्यातीलच नसून इतर जिल्ह्यातही कांदा लागवडीचे क्षेत्र कमालीचे घटले आहे. त्यामुळे आगामी काळात कांद्याचे दर गगणाला भिडणार असल्याचेही बागवान यांनी सांगितले. सध्या ग्रामीण भागातून थोड्याफार प्रमाणात कांद्याची आवक आहे. कांद्याचे दरही १५ ते २० रुपये किलो प्रमाणे आहेत. मात्र आगामी काळात हेच दर गगणाला भिडणार असल्याचे त्यांनी सांगितले. दिवसभर दुकानावर थांबून सरासरी कांद्या, बटाट्याची विक्री होईना. तर दुसरीकडे ग्रामीण भागातून याची आवक घटल्याने पूर्ण बाजारपेठ सुनी-सुनी पडली आहे. दिवसाकाठी खर्चही निघणे मुश्कील झाले आहे.- हफिज बागवान, व्यापारीआम्ही दुहेरी संकटात...एका बाजूने निसर्ग कोपलाय तर दुसऱ्या बाजूने प्रशासनाकडून कांद्याला हमीभाव मिळत नाही. त्यामुळे बेभरवशी कांद्याचे उत्पादन घेण्याचे यंदा टाळले आहे. भाव घसरल्याने पीक न घेतलेलेच परवडले. आम्ही हतबल झालो आहोत.- भाऊसाहेब चाटे, शेतकरी, मांडवादरवर्षी शेतकऱ्यांना आपल्या शेतातील कांदा व्यापारपेठेत पाठविणे जिकीरीचे असते. यंदा लागवडच नसल्याने शेतकरी या पासून दूर आहेत. मात्र कसब लागणार आहे ती व्यापाऱ्यांची. दरवर्षी जिल्ह्यातून निर्यात केला जाणारा कांदा यंदा आयात करण्याची वेळ व्यापाऱ्यांवर आली आहे. या करीता शहरातील बडे व्यापारी नगर, पुणे, सोलापूर या ठिकाणच्या व्यापाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे दिसत आहे.