औरंगाबाद : देशातील मुख्य भाषांपैकी एक असलेल्या उर्दू माध्यमाचे राज्यातील सुमारे १२४ कनिष्ठ महाविद्यालयांतील ११ वी आणि १२ वीचे विद्यार्थी पाच वर्षांपेक्षा जादा काळापासून क्रमिक पुस्तकांशिवाय शिकत आहेत. त्यांना उर्दू भाषेतून क्रमिक पुस्तके उपलब्ध करून द्यावीत, अशी विनंती करणारी जनहित याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.
प्रयत्न करूनही उर्दू भाषेचे भाषांतरकार, मुद्रक आणि प्रकाशक मिळत नसल्यामुळे उर्दू भाषेतून पुस्तके उपलब्ध करून देता येत नसल्याची सबब पुणे येथील ‘महाराष्टÑ राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद’ हे याचिका दाखल झाल्यापासून खंडपीठापुढे मांडत आहेत.
बुधवारी (दि.१० जुलै) रोजी झालेल्या सुनावणीच्या वेळीसुद्धा त्यांनी वरील सबब पुढे केली असता न्या. प्रसन्न वराळे आणि न्या. आर. जी. अवचट यांनी याचिकाकर्त्याला उर्दू भाषेच्या भाषांतरकार, मुद्रक आणि प्रकाशकाचे नाव सुचविण्याची तोंडी मुभा दिली. या जनहित याचिकेवर आता २२ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
स्टुडंटस् इस्लामिक आॅर्गनायझेशन आॅफ इंडियाचे राज्य सचिव मुश्ताब मुनीब यांनी अॅड. तौसीफ सय्यद यांच्यामार्फत ही जनहित याचिका २०१४ साली दाखल केली आहे. त्यांनी याचिकेत म्हटल्यानुसार उर्दू ही देशातील मुख्य भाषांपैकी एक आहे. राज्य घटनेच्या परिशिष्ट-७ मध्ये उर्दू भाषेचा समावेश केलेला आहे. उर्दू ही बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर राज्यांची कार्यालयीन भाषा आहे. महाराष्टÑ राज्यातील सुमारे १२४ कनिष्ठ महाविद्यालयांतील ११ वी आणि १२ वीचे विद्यार्थी उर्दू माध्यमातून शिक्षण घेतात.
प्राप्त आकडेवारीनुसार दरवर्षी सुमारे ९ हजार विद्यार्थी उर्दू माध्यमातून १२ वीची परीक्षा देतात. असे असताना राज्यातील ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी केवळ मराठी आणि इंग्रजी भाषेतूनच क्रमिक पुस्तके पुरविली जातात. उर्दू भाषेतूनही क्रमिक पुस्तके पुरवावीत, अशी विनंती याचिककर्त्याने केली आहे.
द्वितीय भाषा म्हणून उर्दू वगळता अनेक भारतीय आणि विदेशी भाषा उपलब्धपुणे येथील महाराष्टÑ राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या ५ आॅक्टोबर २०१८ रोजीच्या विषययोजन समितीच्या सभेच्या इतिवृत्तात म्हटल्यानुसार उच्च माध्यमिक स्तरावर मराठी, हिंदी, गुजराती, तेलगू, तामिळ, मल्याळम, कन्नड, सिंधी, बंगाली, पंजाबी, संस्कृत, पाली, अर्धमागधी, महाराष्टÑी प्राकृत, अरेबीक, जर्मन, फ्रेंच, रशियन, जपानी, स्पॅनिश, चिनी यापैकी एक द्वितीय भाषा म्हणून उच्च माध्यमिक स्तरावर घेता येईल, असे म्हटले आहे.