लोकमत् न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अकरावीचे पहिले शैक्षणिक सत्र जवळपास पूर्ण होत आले असून, येत्या दोन- तीन दिवसांत दिवाळीच्या सुट्या जाहीर होण्याची शक्यता आहे. असे असताना अजूनही प्रवेशाच्या फे-यांचे सत्र सुरूच आहे. आतापर्यंत प्रवेशाच्या आठ फे-या पूर्ण झाल्या असून, आजपासून नववी व अंतिम फेरी सुरू करण्यात आली आहे. ही फेरी ९ ते ११ आॅक्टोबरदरम्यान प्रथम येणारास प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार राबविण्यात येणार आहे.अकरावीसाठी जवळपास २२ हजार प्रवेश क्षमता आहे. यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सुरुवातीला प्रवेशाच्या नियमित ४ फे-या, विशेष २ आणि प्रथम येणारास प्रथम प्राधान्य या तत्त्वानुसार २, अशा एकूण ८ फे-या राबविण्यात आल्यानंतरही आणखी १० हजार जागा रिक्तच राहिल्या आहेत. अखेरची संधी म्हणून नवव्या फेरीचे आयोजन केले आहे. तथापि, शिक्षण उपसंचालक कार्यालयाने आॅफलाइन प्रवेश प्रक्रिया राबवू नये, असे फर्मानच महाविद्यालयांसाठी काढले आहे.या फेरीसाठी अद्याप कुठेही प्रवेश न घेतलेले विद्यार्थी, महाविद्यालय अथवा शाखा बदलू इच्छिणारे विद्यार्थी व स्थलांतरित होऊन आलेले विद्यार्थी पात्र राहतील. आतापर्यंत ९ हजार ७५७ जागांवर प्रवेशच झालेले नाहीत.अशा आहेत रिक्त जागाआॅनलाइन प्रवेशासाठी शिक्षण विभागाने महाविद्यालयांना ‘कोटा’ ठरवून दिला होता. यामध्ये इन हाऊसच्या ६४९ आणि व्यवस्थापन कोट्यातील ४२५ जागा रिक्त आहेत. रिक्त जागांमध्ये कला शाखा टॉपवर असून, या शाखेच्या ३ हजार ६५२ जागा रिक्त आहेत. त्याखालोखाल विज्ञान शाखेच्या ३ हजार ५५९, कॉमर्स शाखेच्या १ हजार २६८ आणि एमसीव्हीसी शाखेच्या १ हजार २७८ जागात रिक्त राहिलेल्या आहेत. यंदा कॉमर्स आणि एमसीव्हीसी शाखांनाही आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेचा फटका बसला आहे.
११वीच्या दहा हजार जागांसाठी उद्या राबविणार प्रवेशफेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 11:49 PM