औरंगाबाद : सुखना धरणावर गुरुवारी कवड्या टिवळा (सँडरलिंग) प्रजातीचे १२ पक्षी मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. पक्षीमित्र डॉ. किशोर पाठक आणि प्रतीक जोशी गुरुवारी दुपारी सुखना तलावावर गेल्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली. एका अत्यवस्थ पक्ष्याला पाण्यातून बाहेर काढून वाचविण्यात यश आले आहे. या घटनेमुळे तलावातील अतिक्रमणाचा विषय ऐरणीवर आला आहे.
सुखना हा पाणथळीचा तलाव असून, येथे दरवर्षी हिवाळ्यात मोठ्या संख्येने स्थलांतरित पक्षी येतात. साधारण १४४ प्रजातीचे पक्षी येथे आढळले आहेत. हे सर्व पक्षी पाण्यातील कीटक, जलचर, जलवनस्पती खाऊन, तसेच विष्टेद्वारे पिकांना खत पुरवीत असतात. अलीकडे या तलावात अतिक्रमित शेतीचे प्रमाण प्रचंड वाढले असून, त्याचा फटका या पक्ष्यांना बसतो आहे.
या पाणथळीत झडपे तोडून खरबुजाची शेती केली जात आहे. या खरबुजांवर केली जाणारी फवारणी आणि रासायनिक खतांमुळे तलावातील पाणी दूषित होत आहे. यातूनच या पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉ. किशोर पाठक यांनी ‘लोकमत’ला दिली. या तलावात शेतीसोबतच अवैध मासेमारीदेखील सुरू असल्याचे पाठक यांनी सांगितले.
अतिक्रमणधारकांवर कारवाईची मागणीशेती आणि अवैध मासेमारीच्या माध्यमातून सुखना तलावात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्याचा मोठा फटका पक्ष्यांना बसतो आहे. त्यामुळे या अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्याची मागणी डॉ. किशोर पाठक यांनी केली.
जैवविविधतेने संपन्न असलेला तलावऔरंगाबादपासून १८ कि.मी. अंतरावर हा पाणथळीचा तलाव आहे. जैवविविधतेने संपन्न असलेल्या या तलाव परिसरात पक्षी, कीटक, सरडे, साप, जंगली मांजर, कोल्हा, रानडुक्कर, ४५ प्रकारची फुलपाखरे, १६४ प्रकारचे पक्षी आढळतात. रंगीत करकोचा, सारंग, नदी सूरय, चार प्रकारचे बगळे, उघड्या चोचीचा करकोचा, मोहोळघार, लालशिरी गरूड आदी १०० प्रकारचे स्थानिक पक्षी आढळतात.
मच्छीमारांच्या जाळ्यात ‘सारंग’ अडकलामच्छीमारांनी टाकलेल्या जाळ्यात सारंग (ग्रे हेरॉन) हा पक्षी अडकल्याचे गुरुवारी आढळले. जखमी झालेल्या या पक्ष्याची डॉ. किशोर पाठक यांनी जाळे कापून सुटका केली.