पैठण : जायकवाडी धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात आज दुपारनंतर अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. झालेल्या पावसाचे पाणी गतीने नाथसागरात दाखल होत असल्याने तातडीने रात्री १० वाजेच्या दरम्यान धरणाचे आणखी आठ दरवाजे अर्धाफुटाने वर उचलून गोदावरीत विसर्ग वाढविण्यात आला. यामुळे आता धरणाच्या १२ दरवाजातून गोदावरी पात्रात ६२८८ असा विसर्ग होत आहे.
जायकवाडी धरणाचा जलसाठा सायंकाळी सहा वाजता ९८% होता. दरम्यान जायकवाडी धरण व बँकवाटर परिसरात आज अनेक ठिकाणी वादळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने हे पाणी सरळ नाथसागरात दाखल होण्यास प्रारंभ झाला यामुळे अवघ्या तीन तासात धरणाचा जलसाठा ९८.२५%झाला. गतीने धरणाच्या जलाशयात पाणी दाखल होत असल्याने जायकवाडीचे धरण अभियंता संदिप राठोड यांनी या बाबत वरिष्ठांना कल्पना दिली. जायकवाडीचे अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी तातडीने धरणाचे आणखी आठ दरवाजे अर्धा फुटाने वर उचलून धरणातून विसर्ग करण्याचे आदेश दिले.
शनिवारी धरणाच्या दरवाजा क्र १०, २७, १८, १९ या चार दरवाजातून विसर्ग करण्यात आला होता तर रविवारी रात्री १० ते ११ या दरम्यान १६, २१, १४, २३, १२, २५, ११, व २६हे दरवाजे अर्धा फुटाने वर उचलून प्रत्येक दरवाजातून ५२४ क्युसेक्स असा विसर्ग वाढविण्यात आला. यामुळे धरणाच्या १२ दरवाजातून ६२८८ क्युसेक्स व जलविद्युत केंद्रातून १५९० क्युसेक्स असा एकूण ७८७७ क्युसेक्स विसर्ग गोदावरी पात्रात होत आहे. याशिवाय धरणाच्या उजव्या कालव्यातून ६०० व डाव्या कालव्यातून ३०० क्युसेक्स क्षमतेने विसर्ग शुक्रवार पासून सुरू आहे. धरणात सायंकाळी ७३६७ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू होती.
धरणात जेवढी आवक सुरू होती त्यापेक्षा थोड्याफार प्रमाणात विसर्ग वाढविण्यात आला असे अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले. दरम्यान आज नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरण समुहातून होणारे विसर्ग थोडे वाढविण्यात आले आहेत. जायकवाडी धरणातून नियंत्रित विसर्ग करण्यात येईल असे स्पष्टपणे अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.