औरंगाबाद : हर्सूल सावंगी येथे प्रक्रिया केलेला कचरा टाकण्यास विरोध करून दगडफेक करणारे नगरसेवक पूनम बमने व इतर १२ जणांवर शासकीय कामात अडथला आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दगडफेक प्रकरणाची गंभीर दखल घेत बुधवारी मनपा प्रशासनाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
महापालिकेने शहरात प्रक्रिया केलेला कचरा वर्गीकरण करण्यासाठी झाल्टा आणि हर्सूल येथे टाकला आहे. २८ एप्रिलला हर्सूल येथे कचरा टाकण्यात येत असताना नगरसेवक पूनम बमणे यांनी कचरा टाकण्यास विरोध दर्शविला होता. या दरम्यान त्यांनी समर्थकासह स्वत: हातात दगड उचलून मनपाच्या वाहनावर फेकला होता. त्यांच्या कार्यकर्त्यांनीही दगडफेक केली होती. यासोबतच अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, सहायक आयुक्त विक्रम मांडुरके यांना धक्काबुक्कीही करण्यात आली होती. याची गंभीर दखल घेत मनपा प्रशासनाने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश बुधवारी दिले. यानुसार आज नगरसेवक पूनम बमने व इतर १२ जणांविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याच्या गुन्हा हर्सूल ठाण्यात दाखल करण्यात आला. बमने यांच्या विरोधात हा पहिलाच गुन्हा असून या प्रकरणावरून त्यांचे नगरसेवकपदही रद्द होऊ शकते.
काय आहे प्रकरण ?मागील काही दिवसांपासून मनपा प्रक्रिया केलेला कचरा हर्सूल व झाल्टा येथे टाकत आहे. हर्सूल येथे कचरा टाकत असताना दि. २८ एप्रिलला भाजप नगरसेवक पूनम बमणे यांच्यासह त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी कचरा टाकण्यास कडाडून विरोध केला. वाहनांवर दगडफेक, अधिका-यांना धक्काबुक्की करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. ज्या ठिकाणी कचरा टाकण्यात येतोय, तेथून जवळच गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर आहे.पावसाळ्यात पाणी दूषित होईल, कचऱ्यावर केमिकल फवारणी करण्यात येत आहे, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
यासोबतच बमणे यांनी अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, सहायक आयुक्त विक्रम मांडुरके यांच्यासोबत हुज्जत घालत धक्काबुक्कीही केली. नगरसेवक समर्थक रहिम पटेल यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी मनपाच्या वाहनांवर प्रचंड दगडफेक सुरू केली. वाढता विरोध लक्षात घेऊन २५ पेक्षा अधिक कचऱ्याची वाहने परत मध्यवर्ती जकात नाक्यावर नेण्यात आली.