लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डिझेल दराच्या भडक्याने मालवाहतुकीचे भाडेही वाढले आहे. तब्बल १२ टक्क्यांपर्यंत ही दरवाढ झाली आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या भावात किरकोळ वाढ होणार असल्याने सध्या याचा रिणाम जाणवत नसला, तरी येत्या काळात त्याची तीव्रता वाढेल, असे व्यापाऱ्यांचे मत आहे.रुपयाच्या तुलनेत डॉलर महागल्याने डिझेल व पेट्रोलचे दर वाढत आहेत. आज देशातील ६० टक्के मालवाहतूकही रस्त्याद्वारे होते. यामुळे डिझेलच्या दरवाढीचा त्वरित परिणाम मालवाहतुकीच्या भाड्यावर दिसून येतो. बहुतांश जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक मालट्रकद्वारेच होते. यामुळे डिझेल महागले की, जीवनावश्यक वस्तू महागणेअटळच.पेट्रोलपंप मालक प्रवीण जैन यांनी सांगितले की, २४ आॅगस्टला डिझेल ७२.९९ रुपये प्रतिलिटर विक्री झाले. तेव्हापासून दररोज भाववाढ होत आहे. ४ सप्टेंबरला डिझेल ७६.७९ रुपये प्रतिलिटरवर जाऊन पोहोचले. मागील दहा दिवसांत लिटरमागे ३.८० रुपयांनी डिझेल महागले आहे.मालवाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष फय्याजखान यांनी सांगितले की, लिटरमागे ३ रुपये ८० पैैसे एवढी भाववाढही मालवाहतूकदारांसाठी मोठी रक्कम आहे.लांबपल्ल्याच्या मालवाहतुकीसाठी मालट्रकच्या टाकीत ३०० लिटर डिझेल भरले तर जास्तीचे ११४० रुपये, तर ५०० कि.मी.पेक्षा कमी अंतराच्या वाहतुकीसाठी १५० लिटर डिझेल भरले, तर ५७० रुपये जास्तीचे द्यावे लागत आहेत. ज्या कंपन्यांशी मालवाहतुकीचे वार्षिक कंत्राट झाले आहे. ते त्वरित दरवाढ करून देत नाहीत. मात्र, खुल्या बाजारात आमचा करार नसल्याने मालवाहतूक भाडे वाढविता येतात. ५०० कि.मी.पेक्षा जास्त अंतर असलेल्या मालवाहतुकीला लांबपल्ल्याची मालवाहतूक म्हटले जाते. यात ८ टक्के, तर ५०० कमीपेक्षा कमी अंतराच्या मालवाहतुकीला १२ टक्क्यांपर्यंत भाडेवाढ करण्यात आली आहे.
मालवाहतूक दरात १२ टक्क्यांपर्यंत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2018 12:44 AM