औरंगाबाद : ‘वेड्या आईची वेडी माया...’ असे म्हटले जाते. कारण मुलांसाठी आई काहीही करू शकते. पण एका १२ वर्षीय मुलगा मनोविकाराने ग्रस्त झालेल्या आईला घेऊन रस्त्यावर फिरत होता, तिच्या उपचारासाठी धडपडत होता (12 yr Old boy on the road with a mentally ill mother in search of shelter) . सोबत कोणी नातेवाईक नाही, ना कोणाचा आधार. हा सगळा प्रकार पाहून समाजसेवक आणि पोलिसांचेही मन हळहळले. या सर्वांनी प्रयत्न करून महिलेला आणि बालकाला वृद्धाश्रमात दाखल केले.
शहरातील पुंडलिक नगरात ही महिला किरायाच्या घरात आपल्या १२ वर्षीय मुलासोबत राहत होती. हाताला येईल ते काम करून ती उदरनिर्वाह करत होती. लॉकडाऊनपासून काम बंद पडले. घराचे भाडे थकले, किराणा मालाची उधारीही थकली. अशा परिस्थितीत कोणाचाही आधार नसल्याने तिला मनोविकाराने घेरले. बडबडणे, मुलाला मारणे असे प्रकार ती करत होती. अशा परिस्थितीत तिला घरमालकानेही घरातून काढून टाकले. या अवस्थेत मुलाला घेऊन फिरत होती. प्रकृती बिघडल्याने शनिवारी काही नागरिकांनी मुलाच्या मदतीने तिला घाटी रुग्णालयात दाखल केले. मानसोपचार तज्ज्ञांनी तिच्यावर प्रथमोपचार केले.
आपल्याला आईशिवाय कोणाचाही आधार नसल्याचे तिच्या मुलाने घाटीतील समाजसेवा अधीक्षक नरेंद्र भालेराव यांना सांगितले. अशा अवस्थेत आईला कोठे घेऊन जाऊ, असे म्हणून तो रडत होता. भालेराव यांनी ही बाब समाजसेवक सुमित पंडित यांना कळविली. तेव्हा सुमित यानी घाटीत धाव घेऊन आई आणि मुलाची आस्थेवाईकपणे विचारपूस केली आणि धीर दिला.
मुलाला अश्रू अनावर, म्हणाला थँक्यू...मुलाने माहिती दिली की, त्याचे वडील भुसावळ येथे रेल्वेमध्ये नोकरी करतात, पण त्यांनी आईला सोडून दिले आहे. आजी, आजोबा वारले आहेत आणि मामा सांभाळ करत नाहीत. आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्यामुळे माझे शिक्षणही थांबले आहे. सुमित पंडित यांनी ही बाब बेगमपुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार यांना सांगितली. त्यानंतर दोघांना बोरवाडी येथील दैवत वृद्धाश्रम येथे पाठविण्यासंदर्भात नियोजन केले. त्यासाठी माणुसकी टीम आणि पोलिसांनी काही रक्कम जमवून खासगी वाहनाने या मायलेकाला बोरवाडी येथे पाठविण्याची व्यवस्था केली. निवारा मिळाल्याने थँक्यू म्हणताना चिमुकल्याला अश्रू अनावर झाले होते. या मुलाच्या शिक्षणासाठीही प्रयत्न केला जाणार आहे.