औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सन २०१७ मध्ये तत्कालीन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कार्यकाळात कोट्यवधींचा गैरव्यवहार (120 crore fraud in the Dr. Babasaheb Ambedkar Marathvada University during 2017-18 ) झाल्याचे विधिमंडळाच्या आश्वासन समितीच्या चौकशी अहवालात समोर आले आहे.
विद्यापीठात निविदा प्रक्रिया न राबविता मर्जीतील कंत्राटदाराकडून साहित्य खरेदी करणे, विद्यार्थी संख्येपेक्षा दुपटीने प्रश्नपत्रिकांची छपाई करण्याचे कंत्राट देणे, महाविद्यालयांकडून मिळणाऱ्या संलग्निकरण शुल्काची नोंद न ठेवणे, ऑनलाइन असो वा ऑफलाईन प्रश्न पत्रिका वितरणासाठी अधिक खर्च करणे आदी ठपका चौकशी समितीने ठेवला आहे. या समितीने विद्यापीठात १२० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट केले आहे. आता महाआघाडी सरकार यासंदर्भात काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काय होता आरोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरु डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कार्यकाळात झालेल्या 'नॅक' मूल्यांकनाच्या कामांमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने सात सदस्यीय समिती गठित केली होती. विद्यापीठात २०१७-१८ या कालावधीत गरजेपेक्षा जास्त प्रमाणात खरेदी, रस्ते तसेच विविध विभागांत यंत्रसामग्री, इमारतींना रंगरंगोटी करणे, किरकोळ दुरुस्तींच्या मूळ कामे कोट्यवधी रुपयांनी वाढवल्याचा ठपका होता.
या समितीने केली चौकशी चौकशी समितीमध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव सतीश तिडके हे अध्यक्ष आहेत. सदस्य म्हणून मुंबई विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. रवींद्र कुलकुर्णी, उच्चशिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने, विभागीय आयुक्त कार्यालयातील तपासणी शाखेच्या सहायक आयुक्त वैशाली रसाळ, विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी राजेंद्र मडके, मुंबई विद्यापीठाचे कार्यकारी अभियंता, उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. दिगंबर गायकवाड आदींचा समावेश आहे.