औरंगाबाद : शासकीय रुग्णालयांत होणाऱ्या १२० शस्त्रक्रिया कोरोना प्रादुर्भावामुळे गतवर्षी जन आरोग्य योजनेंतर्गत खाजगी रुग्णालयांत सुरू करण्यात आल्या होत्या; परंतु आता पुन्हा या १२० शस्त्रक्रिया, उपचार योजनेंतर्गत खाजगी रुग्णालयांत करणे बंद केले आहे. त्यामुळे रुग्णांना सरकारी रुग्णालयांतच जावे लागणार आहे; अथवा पैसे मोजून खाजगी रुग्णालयांत शस्त्रक्रिया, उपचार करून घ्यावे लागणार आहेत.
शासकीय रुग्णालयांसाठी राखीव असलेल्या १३४ उपचारांपैकी सांधा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, श्रवण यंत्राचा उपचार वगळता १२० उपचार अंगीकृत खाजगी रुग्णालयांत करण्यास २३ मे २०२० मान्यता देण्यात आली होती. यातील लाभार्थ्यांच्या खर्चाची प्रतिपूर्ती खाजगी रुग्णालयास विमा कंपनी, राज्य शासनाद्वारे करण्यात येत होती; परंतु ३१ मार्चपासून या १२० शस्त्रक्रिया खाजगी रुग्णालयांत योजनेंतर्गत बंद करण्यात आल्या आहेत.
थायरॉइड, हर्निया, अपेंडिक्स
योजनेंतर्गत थायराॅइड, हर्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी या महत्त्वाच्या शस्त्रक्रिया खाजगी रुग्णालयांत करता येत होत्या. शहरात बहुतांश रुग्णालयांत कोरोनाचे उपचार सुरू आहेत. त्यामुळे तालुका पातळीवरील खाजगी रुग्णालयांत या शस्त्रक्रिया करण्याकडे ओढा होता; परंतु आता ते बंद केले. या १२० शस्त्रक्रिया खाजगी रुग्णालयांत पूर्ववत कराव्यात, अशी मागणी असल्याचे डाॅ. प्रशांत चव्हाण म्हणाले.
शस्त्रक्रिया खुल्या करण्याची मागणी
शासकीय रुग्णालयांत होणाऱ्या १२० शस्त्रक्रिया, उपचार योजनेंतर्गत खाजगी रुग्णालयांत होत होत्या. त्या आता खाजगी रुग्णालयांत बंद करण्यात आल्या आहेत. आता या शस्त्रक्रिया शासकीय रुग्णालयांतच होतील. खाजगी रुग्णालये कोरोनाचे उपचार करीत आहेत. त्यामुळे रुग्णांना अडचण येऊ नये, असे कारण नमूद करण्यात आले आहे. ज्या शस्त्रक्रिया खाजगी रुग्णालयांत करणे शक्य आहे, त्या खुल्या करण्याची मागणी केली आहे.
-डाॅ. हिमांशू गुप्ता, अध्यक्ष, मराठवाडा हाॅस्पिटल असाेसिएशन
--
पुन्हा राखीव केले
शासकीय रुग्णालयांसाठी १२० शस्त्रक्रिया, उपचार राखीव होते; परंतु कोरोनामुळे गतवर्षी त्या खाजगी रुग्णालयांतही सुरू करण्यात आल्या होत्या; परंतु आता पुन्हा एकदा या शस्त्रक्रिया, उपचार शासकीय रुग्णालयांसाठी राखीव करण्यात आले आहेत.
-डाॅ. मिलिंद जोशी, जिल्हा समन्वयक, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना