पिशोर : महावितरणच्या उपविभागांतर्गत शेतीपंप ग्राहकांकडे सुमारे १२४ कोटी २९ लाख रुपयांची थकबाकी आहे. १० फेब्रुवारीपर्यंत भरणा न केल्याने महावितरणने शेतकऱ्यांचे रोहित्र बंद केल्याने ऐन रब्बीत शेतकऱ्यांना शॉक दिला आहे.
पिशोर उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या सहा विभागात सुमारे ८५ ते ९० गावे येतात. पिशोर येथील १४,२३१ शेती पंपाचे ग्राहक आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून येथील शेतकऱ्यांकडे वीज बिल थकीत आहे. पिशोर विभागातील १२ गावातील २,३६० ग्राहकांकडे सुमारे १६ कोटी ७७ लाख ७३ हजार ६६६ रुपयांची थकबाकी आहे. या थकीत ग्राहकांना १० तारखेपर्यंत बिल भरण्यास मुदत देण्यात आली होती. मात्र ते न भरले गेल्याने उपविभागातील अनेक शेती पंप जोडणी असलेल्या संपूर्ण डीपीच महावितरणने बंद करून टाकल्या आहेत. बुधवारी सकाळपासून पिशोर येथील कार्यालयावर शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. पळशी बु. येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने सहायक अभियंता प्रमोद पिंपळकर यांची भेट घेऊन बिल भरण्यासाठी आणखी वेळ देण्याची मागणी केली. पिंपळकर यांनी पाच दिवस मुदतवाढ दिली असून दुपारनंतर वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले.