औरंगाबाद : मराठवाड्यात २०२१ सालाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यांत १२७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. औरंगाबाद आणि बीड या दोन जिल्ह्यांत आत्महत्येच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. गतवर्षी याच काळात १२२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. या वर्षी १२७ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली आहे.
जानेवारी २०२१ मध्ये ५७, तर फेब्रुवारीत ७० अशा एकूण १२७ शेतकऱ्यांनी विविध कारणांमुळे जीवनयात्रा संपविली. औरंगाबादेत २६, जालना ११, परभणी १०, हिंगोली ४, नांदेड १७, बीड ३०, लातूर १३ आणि उस्मानाबादमधील १६ शेतकऱ्यांचा समावेश आहे.
गेले दोन पावसाळे मराठवाड्यात चांगले बरसले; मात्र अतिवृष्टी व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले. गेल्या पावसाळ्यात खरीप हंगामातील व यंदा गेल्या महिन्यात रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान अवकाळी पावसाने केले. या अस्मानी संकटामुळे शेतकरी हतबल झाला आहे. परिणामी हा सगळा नैसर्गिक खेळ शेतकऱ्यांच्या जिवावर बेतत असून, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांत १२७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ३९ घटना शासकीय मदतीसाठी पात्र ठरल्या आहेत. ८७ घटनांची चौकशी सुरू आहे, तर १ प्रकरण अपात्र ठरले आहे. गेल्या वर्षी ७७३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यांतील ६१७ प्रकरणांत मदत करण्यात आली. ११० प्रकरणे अपात्र ठरविली तर ४६ प्रकरणांत चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.