औरंगाबाद : कोरोनामुळे दहावीपाठोपाठ आता बारावीची परीक्षादेखील रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे पदवी व अन्य प्रवेशप्रक्रिया कशा होणार, याची चिंता पालक व विद्यार्थ्यांना लागली आहे. गुणदान कसे होईल, निकाल कधी लागेल, पदवी प्रथम वर्षाचे प्रवेश कधी, कसे होतील, असे सवाल पालक, विद्यार्थ्यांतून उपस्थित होत आहेत.
जिल्ह्यातील ५७४ शाळा - कनिष्ठ महाविद्यालयांतील एकूण ६३ हजार २१५ विद्यार्थ्यांची बारावीची परीक्षा रद्द झाली आहे. निकालानंतर या विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमासह शाॅर्टटर्म कोर्सेस वा व्यावसायिक शिक्षणासाठीचे प्रवेश कसे होतील, याची चिंता सतावत आहे. आता गुणदान निष्पक्षपणे झाले पाहिजे. राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षा रद्द होऊन दहावी आणि अकरावीच्या गुणांचा आधार तसेच यावर्षीचे अंतर्गत मूल्यमापन त्यात व्हावे. कारण शहरी विद्यार्थ्यांप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण पोहोचलेले नाही तसेच आपत्कालीन परिस्थितीमुळे शून्य शैक्षणिक वर्षाचाही विचार झाला पाहिजे, असे मत शिक्षणतज्ज्ञ एस.पी. जवळकर यांनी व्यक्त केले.
जिल्ह्यात बारावीतील एकूण विद्यार्थी -६३,२१५
मुले- ३६,९७७
मुली - २६,२३८
---
बारावीनंतरच्या संधी
अभियांत्रिकी, वैद्यकीय अभ्यासक्रमासह व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश सीईटीच्या माध्यमातून होतात तर बीबीए, बीसीए यासाठी स्थानिक स्तरावर क्षमतेपेक्षा अधिक अर्जदार असल्यास गरजेनुसार सीईटी महाविद्यालयांकडून आयोजित करून प्रवेश दिले जातात. याशिवाय शाॅर्टटर्म कोर्सेस, स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने पदवी अभ्यासक्रमांच्याही संधी बारावीनंतर उपलब्ध होतात.
---
प्राचार्य म्हणतात..
व्यावसायिक, वैद्यकीय पदवी अभ्यासक्रम हे सीईटीवर अवलंबून असतात. ज्या विद्यार्थ्यांनी अकरावी, बारावीचा अभ्यास केला आहे तो अभ्यास या सीईटीला कामी येईल. अद्याप बारावीच्या गुणदानाचे सूत्र निश्चित नाही. बीबीए, बीसीए आदी पदव्यांना क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश असतील तर तिथे स्थानिक स्तरावर सीईटीचे आयोजन केले जाऊ शकते. अजून त्यासंदर्भातील कुठल्याही गाइडलाइन्स नाहीत.
- रामदास वनारे, प्राचार्य, विवेकानंद महाविद्यालय
--
दहावी, अकरावीचे गुण, बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनावरून बारावीच्या गुणदानाचे सूत्र ठरविण्याबद्दल चर्चा सुरू आहे. अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. व्यावसायिक अभ्यासक्रम, कोर्स ऑनलाइन होऊ शकत नाही. त्यात प्रात्यक्षिक गरजेचे असतात. इतर पदवी अभ्यासक्रमांसाठी बारावीच्या गुणांची आवश्यकता असते. त्यावरून प्रवेश होतील; पण ते शासन निर्णयानंतरच स्पष्ट होईल.
-बालाजी नागतिलक, प्राचार्य, स.भु. विज्ञान महाविद्यालय
--
विद्यार्थी म्हणतात...
बारावीच्या निकालांसाठी गुणसूत्र काय ठरते, याकडे लक्ष आहे. निकाल लागल्यावर तांत्रिक अडचणी येऊ नयेत. कोरोनामुळे परीक्षेशिवाय पास झालेले विद्यार्थी म्हणून वेगळी वागणूक मिळण्याची भीती वाटते.
- प्रतीक्षा गाडे, विद्यार्थिनी
---
दहावीत गुण कमी होते. पण अकरावी, बारावीत खूप मेहनत घेतली. त्याचे योग्य मूल्यमापन व्हावे. निकाल लवकर लागला तर पुढील शैक्षणिक वर्षाचे नुकसान होणार नाही. पुढच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व परीक्षा लवकर व्हायला पाहिजे.
- अंकुश चव्हाण, विद्यार्थी
---
पालक म्हणतात...
परीक्षा न झाल्याने गुणवंत विद्यार्थ्यांवर एकप्रकारे अन्याय होणार आहे. कोरोनामुळे झालेल्या या निर्णयात किमान मूल्यमापन योग्य व लवकर व्हावे. जेणेकरून पुढील संधीत या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही.
-दीपाली पंडित, पालक
---
परीक्षा रद्द केली आता किमान पदवीच्या प्रवेश पूर्वपरीक्षांत असे घाईने निर्णय होऊ नये. लवकर परीक्षा घेऊन लवकर निकाल लागावा. यासाठी शासनाने सूक्ष्म कृती आराखडा केला पाहिजे. त्याची अंमलबजावणी विनाविलंब व्हावी.
- फिरोज तडवी, पालक