छत्रपती संभाजीनगर : लिपिकपदाची मान्यता काढण्यासाठी १३ लाखांची लाच मागणी केली. ही लाच धनादेश आणि रोख स्वरूपात घेतली गेली. यानंतर प्रतिबंधक विभागाने तब्बल सहा महिन्यांनंतर संस्थाचालकासह चार जणांविरोधात गुन्हा नोंदविला.
पांडुरंग दिगंबर भगनुरे, कांतीलाल बाबूलाल पांडे (रा. एन १२, हडको), विलास रामदासराव वाकोडे (रा. गादिया विहार) आणि एका महिलेचा आरोपीमध्ये समावेश आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार आरोपी भगनुरे आणि महिला ही चैतन्य शिक्षण संस्था संचालित रावसाहेब पाटील प्राथमिक व माध्यमिक निवासी आश्रम शाळा, चिकलठाणा येथे राहतात. तक्रारदार राजू आसाराम बडवणे (४०, रा. न्यू हनुमाननगर) यांच्या मुलीला चैतन्य शिक्षण संस्थेच्या रावसाहेब पाटील प्राथमिक व माध्यमिक निवासी आश्रमशाळेत लिपिकपदाची नोकरी देण्यासाठी आणि याबाबतची शिक्षण विभागाकडून मान्यता काढून देण्यासाठी १३ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली.
तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याविषयी आरोपींविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती. ठरल्यानुसार १० डिसेंबर २०२२ रोजी संस्थेचे सचिव भगनुरे यांनी बडवणे यांच्याकडून पाच, पाच लाखांचे दोन धनादेश आणि तीन लाख रुपये रोख म्हणून (यात २ लाख ९० हजारांच्या बनावट नोटा व दहा हजारांच्या चलनी नोटा) घेताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडले होते. यावेळी पंचांसमक्ष आरोपींकडून ही रक्कम आणि धनादेश जप्त केले होते. मात्र, तेव्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपींविरोधात गुन्हा नोंद केला नव्हता.
कायदेशीर सल्ल्यानंतर नोंदविला गुन्हाही कारवाई केल्यानंतर ही खाजगी शिक्षण संस्था असल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला संस्थांचालकाविरोधात कारवाईचे अधिकार आहेत अथवा नाही, याविषयी पोलिस अधीक्षकांनी विधि सल्लागारांचा अहवाल मागितला होता. विधि सल्लागाराने यात कारवाईचे अधिकार एसीबीला असल्याचे नमूद केल्याने याप्रकरणी २० मे रोजी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संदीप आटोळे यांनी सांगितले.