औरंगाबाद : वाल्मिकी समाजातील तरुणांना लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाईगारपदासाठी नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या ३९ पैकी १३ जणांना घाटी प्रशासनाने नियुक्तीपत्रे दिली. या कर्मचाऱ्यांना सध्या २९ दिवसांच्या करारावर नोकरी देण्यात आली आहे. त्यांच्या चारित्र्य पडताळणीचा अहवाल आल्यानंतरच त्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यात येणार आहे.घाटी रुग्णालयात चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची सुमारे १४९ पदे रिक्त आहेत. यात बहुतेक पदे ही सफाईगारांची आहेत. घाटीतील ५० टक्के कर्मचाऱ्यांनी वयाची पन्नाशी ओलांडलेली आहे. शिवाय अनेक कर्मचारी मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, टी. बी. इत्यादी. आजारांनी त्रस्त आहेत. तर अनेक जण व्यसनी आहेत. त्यामुळे घाटीच्या स्वच्छतेच्या कामावर त्याचा परिणाम होत आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यास परवानगी द्यावी, याकरिता शासनाकडे पाठपुरावा केला होता. दरम्यान, शासनाने एक अध्यादेश काढून लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार अर्ज करणाऱ्या तरुणांना नियुक्त्या देण्याचे कळविले होते. घाटी प्रशासनाने त्याकरिता निवड समिती स्थापन केली. समितीने प्राप्त अर्जांची छाननी केली. वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आदींचा विचार करून ३९ अर्ज वैध ठरविले. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १३ जणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. या उमेदवारांना सध्या २९ दिवसांची नियुक्ती देण्यात आली आहे. त्यांचा जिल्हा शल्यचिकित्सकांकडून शारीरिक वैद्यकीय तपासणी अहवाल आणि पोलिसांकडून चारित्र्य पडताळणी अहवाल मागविण्यात आला आहे. हे अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांना सरळसेवा भरती प्रक्रियेनुसार कायमस्वरूपी नियुक्ती देण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
१३ जणांची घाटीकडून सफाईगारपदी नियुक्ती
By admin | Published: September 15, 2014 12:33 AM