छत्रपती संभाजीनगर : १३० किलोमीटर अंतरावरील मालेगाव येथून शहरात येत दुचाकी चोरणाऱ्यास वेदांतनगर पोलिसांनी चोरी करण्यासाठी आल्यानंतर पकडले. त्याच्याकडून पोलिसांनी चोरलेल्या दोन दुचाकीही हस्तगत केल्याची माहिती पोलिस निरीक्षक ब्रह्मा गिरी यांनी दिली. मुलीचे लग्न करण्यासाठी दुचाकी चोरून पैसे जमा करीत असल्याचा दावाही चोरट्याने केला आहे.
मोहम्मद परवेज जमीलोद्दीन आलम (४५, रा. मालेगाव, जि. नाशिक) असे अट्टल दुचाकी चोराचे नाव आहे. वेदांतनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक ब्रह्मा गिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वेस्थानक परिसरातील दुचाकी चोरी रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलिस गस्त घालतात. याच पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन दुचाकी चोरीला गेल्या होत्या. दुचाकी चोरताना मोहम्मद परवेज हा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. २ एप्रिल रोजी तो पुन्हा दुचाकी चोरीसाठी शहरात आला होता. तेव्हा गस्तीवरील पोलिसांना संशय आला. त्यांनी त्याला थेट पोलिस ठाण्यात आणले.
त्याठिकाणी सीसीटीव्ही दाखवून चौकशी केल्यानंतर त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली. त्याला अटक केली तर न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली होती, कोठडी दरम्यान त्याने २०२२ आणि २०२३ मध्ये दोन दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून ८६ हजार रुपयांच्या दोन्ही दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई निरीक्षक गिरी यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक अनिल कंकाळ, अयुब तडवी, स्वाती बनसोडे, मनोज जैस्वाल, जमीर तडवी यांनी केली.