औरंगाबाद : निपाणी येथील कलरच्या गोदामामधून १२ लाख ६१ हजार १९५ रुपयांचे १ हजार ७२४ डबे घेऊन पोबारा करणाऱ्या भामट्यास चिकलठाणा पोलिसांनी १३०० किलोमीटर प्रवास करत मुद्देमालासह शोधून आणले आहे. या गुन्ह्यातील १०० टक्के मुद्देमाल परत मिळविण्यात पोलिसांना यश मिळाल्याची माहिती निरीक्षक देविदास गात यांनी दिली.
निपाणी येथील गोडाऊनमधून ज्ञानेश्वर सोने यांचा विश्वास संपादन करून एका भामट्याने भाड्याचा बनाव करत गोडाऊनमधील माल बाब ट्रेडर्स येथे पोहोचता केला जाईल, असे सांगून पेंटचा माल पळवून नेला होता. या प्रकरणी गुन्हा नोंदविल्यानंतर तपास अधिकारी सहायक निरीक्षक शरदचंद्र रोडगे हे पोलीस अधीक्षक नीमित गोयल यांची परवानगी घेऊन पथकासह थेट मध्य प्रदेशात पोहोचले. या प्रकरणात लोकेश केदारमल कुभंज (४५, रा. वैभवनगर, इंदौर, मध्य प्रदेश) हा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यास ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखवताच त्याने किशोर नावाच्या व्यक्तीला माल दिल्याचे सांगितले. आरोपीने पळवलेला माल बगवण्य (ता. धामनोड, जि.धार, मध्य प्रदेश) गावात दडवला असल्याचे सांगितले.
चोरीचा माल ठेवलेल्या गोडाऊनवर पोलीस पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापा मारला तेव्हा पंचांसमक्ष १२ लाख ६१ हजार १९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या गुन्ह्यात लोकेशला अटक करण्यात आली असून, इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. चिकलठाणा पोलिसांनी ४८ तासात १३०० किलोमीटरचा प्रवास करून चोरी गेलेला १०० टक्के मुद्देमाल शोधून काढला आहे. ही कामगिरी निरीक्षक देवीदास गात यांच्या मार्गदर्शनात सपोनि शरदचंद्र रोडगे, जमादार थोटे, दीपक सुरोशे यांच्या पथकाने केली.