औरंगाबाद : विज बिल प्रलंबित असून, तात्काळ भरणा करा अन्यथा तुमचे विज कनेक्शन कट केले जाईल, अशी मेसेज पाठवून सायबर भामट्याने वृद्धाची १ लाख ३२ हजार रुपयांची फसवणूक केली. फसवून बँक खात्यात वळते केलेले पैसे ग्रामीण सायबर पोलिसांनी परत मिळवून दिल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी दिली.
जेष्ठ नागरिक भास्कर सोपान चौधरी हे २०११ मध्ये सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना ७ फेब्रुवारी रोजी व्हाट्सअपवर तुमचे वीज बिल प्रलंबित असून त्यांचा तात्काळ भरणा करा नसता तुमचे कनेक्शन बंद करण्यात येईल असा मेसेज आला. तसेच कनेक्शन बंद करायचे नसेल तर मेसेज मध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगितले. त्यानुसार चौधरी यांनी मोबाईल क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर सायबर भामटयाने त्यांना एका लिंकवर क्लिक करण्यास सांगून एक क्विक सपोर्ट नावाचे रिमोर्ट एक्सेसचे ॲप्लीकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले. तेव्हा त्यांच्या बँक खात्यातुन दोन वेळा ५० हजार आणि एकदा ३२ हजार रुपये ट्रान्सफर करण्यात आले. बँक खात्यातुन पैसे कटचा मेसेज आल्यानंतर त्यांनी ग्रामीण साबयर पोलिसांशी संपर्क साधला. सायबर पोलिसांनी तात्काळ प्रतिसाद देत चौधरी यांचे पैसे ज्याठिकाणी वापरले.
त्यासंबंधित यंत्रणेशी संपर्क साधून त्या बँक खात्यातील व्यवहार थांबवून रक्कम जागीच ब्लॉक केली. त्यामुळे चौधरी यांना २३ फेब्रुवारी रोजी १ लाख ३२ हजार रुपये त्यांच्या बँक परत जमा झाले. ही कामगिरी पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया, अप्पर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनान सायबरचे निरीक्षक देविदास गात, उनिरीक्षक प्रवीण पाटील, भारत माने हवालदार कैलास कामठे, संदिप वरपे, नितिन जाधव, रविंद्र लोखंडे, सविता जायभाये, लखन पचोळे, योगेश दारवंटे, मुकेश वाघ, रूपाली ढोले, शितल खंडागळे यांच्या पथकाने केली. दरम्यान पैसे परत मिळताच चौधरी यांनी अधीक्षक कार्यालय गाठत कलवानिया, निरीक्षक गात यांच्यासह साबयर टीमचे अभिनंदन केले.