औरंगाबाद : कोरोनाच्या मृत्यूचे आकडे कमी दाखविण्यात येत असल्याचा आरोप राज्यात सर्वत्र विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. या आरोपात काही प्रमाणात तथ्य असल्याचे आता समोर येत आहे. औरंगाबाद शहरात कोरोनामुळे तब्बल १७६२ नागरिकांचा फक्त एप्रिल महिन्यात मृत्यू झाला. कोरोनामुळे ४३२ तर १३३० जणांवर संशयित म्हणून अंत्यसंस्कार करण्यात आले. संशयितांचा आकडा एवढा कसा काय होऊ शकतो, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
एप्रिल महिन्यात मृत्यूच्या आकड्याने सर्वोच्च टोक गाठल्यासारखे दिसून येत आहे. या महिन्यात २ हजार ८५४ नागरिकांच्या मृत्यूची नोंद महापालिकेच्या दप्तरी करण्यात आलेली आहे. मागच्या पाच वर्षांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू कधीच झाले नव्हते. दरवर्षी एप्रिल महिन्यात साधारणपणे ६०० ते ७०० नागरिकांचा मृत्यू होत असल्याचे दिसून येते. मात्र, यंदा सर्वाधिक मृत्यूची नोंद आहे. २ हजार ८५४ मध्ये कोरोनाने मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या ४३२ आहे. उर्वरित १ हजार ३३० नागरिकांची कोरोना संशयित म्हणून मृत्यू झाल्याची नोंद आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात संशयित कसे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर रुग्णांचा रिपोर्ट येण्यासाठी तीन ते चार दिवसांचा अवधी लागत होता. त्या दरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला तर त्याला संशयित असे घोषित केले जात होते. आता सकाळी लाळेचे नमुने दिले तर संध्याकाळी रिपोर्ट मिळत आहे. असे असतानाही एकट्या एप्रिल महिन्यात १३३० नागरिकांच्या मृत्यूची नोंद संशयित म्हणून घेतली. कोरोनाच्या मृत्यूचा खरा आकडा लपविण्यासाठी हा सर्व खटाटोप केला का? राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या मृत्यूचे आकडे कमी दाखविण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
कोविड नसलेल्या अकराशे जणांचा मृत्यू
एप्रिल महिन्यात कोविड नसलेल्या १ हजार ९३ नागरिकांचा मृत्यू झाला. शहरातील वेगवेगळ्या स्मशानभूमी आणि कब्रस्तानात त्यांच्यावर विधी करण्यात आला. एप्रिल महिन्यात यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू कधीच झाले नव्हते हे विशेष. २०१७ -५९९, २०१८-६७९, २०१९-७००, २०२०-६२१ नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
पॉझिटिव्ह नसले तरी काही रुग्ण संशयित असतात
काही कोरोना रुग्णांचा रिपोर्ट वारंवार तपासणी केली तरी निगेटिव्ह येतो. त्यांच्या शरीरात कोरोनाची लक्षणे असतात. मात्र रिपोर्ट पॉझिटिव्ह नसतो. त्यामुळे संबंधित रुग्णाला शेवटपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह असे समजून उपचार करण्यात येतात. दुर्दैवाने रुग्ण दगावला तर त्याला संशयित म्हणून पुढील प्रक्रिया करण्यात येते. त्यामुळे संशयितांचा आकडा मोठा वाटत आहे.
डॉ. नीता पाडळकर आरोग्य वैद्यकीय अधिकारी मनपा.