औरंगाबाद : प्रकृती बिघडल्याने कोरोनामुळे शहरातील एका रुग्णालयात २ वर्षांचे बाळ दाखल झाले. त्यानंतर, बाळाच्या आई आणि बाबांचीही तपासणी केली. दोघेही निगेटिव्ह, पण चिमुकल्यासाठी आई पीपीई किट घालून बाळाजवळ थांबली. गेल्या दीड वर्षात शहरात ५ वर्षांपर्यंतच्या एक हजार ३९५ बालकांना कोरोनाने घेरले. यात कोरोना पाॅझिटिव्हसह निगेटिव्ह असलेल्या पालकांनी चिमुकल्यांसोबत कोरोनाशी यशस्वी लढा दिला.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांसह अनेक कुटुंब पाॅझिटिव्ह झाले, तर काही घरांत केवळ शिशू बाधित आढळले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचे सांगितले जाते. त्यानुसार, आरोग्य यंत्रणा सज्ज केली जात आहे, परंतु कोरोनाला यापूर्वीच बालकांनी हरविले आहे. घरातील मोठ्या व्यक्तींपासूनच मुलांना कोरोनाचा संसर्ग होण्याची सर्वाधिक शक्यता असते. त्यामुळे आई-वडिलांसह घरातील प्रत्येक व्यक्तीने खबरदारी घेणे गरजेचे आहे. घरात लहान मूल असेल, तर लस घेण्यास प्राधान्यक्रम दिला पाहिजे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
घाटीतील बालरोग विभागप्रमुख डाॅ.प्रभा खैरे म्हणाल्या, घाटीत ५ वर्षांपर्यंतच्या ६९ बालकांवर उपचार करण्यात आले. बहुतांश शिशुंचे पालक कोरोनाबाधित होते. काही शिशुंचे पालक निगेटिव्ह होते. बाळाला कोरोना झाला की, आईला सोबत थांबावे लागते. एकूण कोरोनाबाधित शिशुंपैकी किती जणांचे पालक निगेटिव्ह होते, या संदर्भात महापालिकेकडूनही आढावा घेण्यात येत आहे.
---
केस-१
एप्रिल महिन्यात जालना जिल्ह्यातील जामखेड येथील ९ महिन्यांच्या शिशूला कोरोनाची बाधा झाली. घरात कोणालाही कोरोनाचे निदान झाले नाही, पण शिशूला कोरोनाने गाठले. घाटीत ३ दिवस व्हेंटिलेटरवर राहिल्यानंतर, शिशूच्या प्रकृतीत सुधारणा झाली. शिशूची खबरदारी घेण्यासाठी आईही रुग्णालयात होती.
केस-२
मे महिन्यात शहरातील एका खासगी रुग्णालयात २ वर्षांचे बाळ दाखल झाले होते. डाॅक्टरांकडून उपचार सुरू असताना, आईने पीपीई किट घालून उपचारासाठी साथ दिली. गंभीर अवस्थेत असलेले बाळ अगदी ठणठणीत होऊन रुग्णालयातून बाहेर पडले. डाॅक्टरांनी या मातेचे कौतुक केले.