छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीत ८ जागांसाठी एकूण १८ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. रविवारी पार पडलेल्या छाननीत सर्व १८ अर्ज वैध ठरले. राखीव ४ जागांसाठी प्रत्येकी एकच अर्ज असून खुल्या प्रवर्गातील ४ जागांसाठी तब्बल १४ जणांनी अर्ज दाखल केले असून व्यवस्थापन परिषदेत निवडून जाण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे.
अधिसभा, विद्या परिषद व अभ्यास मंडळाच्या निवडणुका कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पाडल्या. आता दुसऱ्या टप्प्यात व्यवस्थापन परिषदेच्या आठ जागांसाठी २१ ते २५ फेब्रुवारी या काळात एकूण १८ अर्ज दाखल झाले. सर्व अर्ज वैध ठरल्याने रविवारी छाननी होईल. ६ मार्च रोजी माघार घेण्याची मुदत असून त्याच दिवशी उमेदवारांची अंतिम यादी घोषित होईल. त्यानंतर १३ मार्चला अधिसभेच्या बैठकीत मतदान होईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी, कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी दिली.
खुल्या प्रवर्गात चुरस
प्राचार्य, प्राध्यापक, संस्थाचालक व पदवीधर गटातून प्रत्येकी एक जागा खुल्या गटातील अशा चार जागांसाठी १४ जणांनी अर्ज भरले आहेत. यामध्ये प्राचार्य गटातून डॉ. विश्वास कंधारे, डॉ. बाबासाहेब गोरे व डॉ. भारत खंदारे, संस्थाचालकांतून गोविंद देशमुख, डॉ. मेहेर पाथ्रीकर, बस्वराज मंगरुळे, तर पदवीधर प्रवर्गातून गटातून योगिता होके पाटील, प्रा. हरिदास सोमवंशी व प्रा. सुनील मगरे यांचे दाखल झाले आहेत. शिक्षक गटातून खुल्या प्रवर्गातून पाचजण निवडून आले. त्या पाचही जणांनी व्यवस्थापन परिषदेसाठी अर्ज भरला आहे. डॉ. अंकुश कदम, डॉ. मुंजाबा धोंडगे, डॉ. विक्रम खिल्लारे, डॉ. शंकर अंभोरे, डॉ. भगवानसिंग डोभाळ आदींनी अर्ज वैध ठरले आहे. त्यामुळे खुल्या गटात चुरस आहे.
राखीव जागा बिनविरोधराखीव जागांसाठी चार गटांतून प्रत्येकी एकच उमेदवाराचा अर्ज दाखल झाला आहे. प्राचार्य - एससी प्रवर्ग डॉ. गौतम पाटील, संस्थाचालक-एसटी प्रवर्ग नितीन जाधव, पदवीधर- व्हीजेएनटी प्रवर्ग दत्तात्रय भांगे आणि शिक्षक -ओबीसी प्रवर्ग डॉ. रविकिरण सावंत याप्रमाणे प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने या जागा बिनविरोध निवडल्या जातील. छाननीत सर्व अर्ज वैध ठरल्याने निवडणूकीची केवळ औपचारीकता शिल्लक आहे.