औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास (घाटी) तब्बल १४ वर्षांनी ‘एमबीबीएस’च्या वाढीव जागांना मान्यता मिळाली आहे. जवळपास ४३ त्रुटींची पूर्तता करण्यात आल्याने १०० वरून १५० जागांसाठी भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने (एमसीआय) मंजुरी दिली आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘एमबीबीएस’च्या जागा १९९८ मध्ये १०० वरून १५० करण्यात आल्या. या वाढीव ५० जागांसाठी २००३ मध्ये मान्यता मिळणे अपेक्षित होते. परंतु महाविद्यालयातील त्रुटींमुळे या जागांची मान्यता रखडली. वसतिगृह, ग्रंथालयासह तब्बल ४३ त्रुटींमुळे मान्यता मिळविण्यासाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागली. या त्रुटींसाठी गेल्या काही वर्षांत ‘एमसीआय’कडून तब्बल २३ वेळा पाहणी करण्यात आली. प्रत्येक वेळी त्यासाठी ३ लाख रुपयांचे शुल्क भरण्यात येत होते. परंतु तरीही काही केल्या त्रुटींची पूर्तता होत नव्हती. परंतु गेल्या वर्षभरात सर्व त्रुटी निकाली काढण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करण्यात आले. सुसज्ज वसतिगृह आणि ग्रंथालय उभारण्यात आले. याठिकाणी लवकरच आवश्यक ते फर्निचर दाखल होणार आहे. या सगळ्याची दखल घेत ‘एमसीआय’ने १५० जागांना मान्यता दिली. १९९८ पासून यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर त्यास यश आल्याचे उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी सांगितले.
समारंभाचा आनंद द्विगुणितशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास (घाटी) ‘एमसीआय’चे पत्र प्राप्त झाले. यामुळे ‘एमबीबीएस’च्या २०१२ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांच्या पदवीदान समारंभाचा आनंद द्विगुणित झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.