औरंगाबाद : शहरातील उल्कानगरी परिसरातील खिंवसरा पार्क येथे एका घरात असलेल्या इलेक्ट्रॉनिक साहित्याच्या गोडाऊनला लागलेल्या आगीत १४ वर्षीय बालकाचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. संस्कार शामसुंदर जाधव असे मृताचे नाव आहे. या आगीतील धुरामुळे शामसुंदर जाधव त्यांच्या पत्नी सविता व मुलगी संकृती या अत्यवस्थ असून त्यांच्यावर हेडगेवार रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, खिंवसर पार्क येथील पाठक यांच्या घरात शामसुंदर जाधव हे भाड्याने राहतात. त्यांच्या इलेक्ट्रॉनिक साहित्याचा व्यवसाय आहे. याच घराच्या खालच्या मजल्यावर त्यांनी इलेक्ट्रोनिक साहित्याचे गोडाऊन केले आहे. बुधवारी रात्री या गोडाऊन मध्ये त्यांनी माल उतरवला होता. बुधवारी पहाटे अचानक या गोडाऊनला आग लागली आणि धुराचे लोट त्यातून बाहेर पडले. हा धूर वरच्या मजल्यावर राहत असलेल्या जाधव यांच्या घरात पोहंचला. काही क्षणात संपूर्ण घरात मोठ्याप्रमाणावर धूर झाल्याने जाधव कुटुंबास बाहेर पडण्यास संधी मिळाली नाही. पहाते गोडाऊनला आग लागल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलीस व अग्निशमन दलास माहिती दिली. अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरु केले.
खालच्या मजल्यावरील गोडाऊनमधील आग विझवून अग्निशमन दलाने घरात प्रवेश केला. यावेळी घरामध्ये १४ वर्षीय संस्कार जाधव याचा गुदमरून मृत्यू झाल्याचे तर जाधव यांचे संपूर्ण कुटुंब अत्यवस्थ असल्याचे आढळून आले. यानंतर पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी शामसुंदर जाधव त्यांच्या पत्नी सविता व मुलगी संकृती यांना हेडगेवार रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.